For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी सैनिकाला लुटणाऱ्या न्यू गांधीनगरच्या गुंडाला अटक

06:45 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी सैनिकाला लुटणाऱ्या न्यू गांधीनगरच्या गुंडाला अटक
Advertisement

साथीदार फरार, परिसरात गुन्हेगारीत वाढ

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गावी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या होनियाळ, ता. बेळगाव येथील एका माजी सैनिकाला लुटणाऱ्या जोडगोळीपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याचा आणखी एक साथीदार फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

परवेज जमीर पारिश्वाडी (वय 25) रा. आदिलशहा गल्ली, न्यू गांधीनगर असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार फरहान दलायत हा फरारी झाला आहे. परवेज व फरहान या दोघा जणांनी 4 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री होनियाळ येथील राजेंद्र सनगौडा पाटील (वय 54) यांना लुटले होते.

माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या जोडगोळीने लुटमारीसाठी वापरलेली केए 22 एए 0044 क्रमांकाची ऑटोरिक्षा व 1200 रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, बी. एफ. बस्तवाड, के. बी. गौरानी, रवी बारीकर, मल्लिकार्जुन गाडवी आदींनी या कारवाईत भाग घेतला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पाटील हे दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता होनियाळला जाण्यासाठी एस. सी. मोटर्सजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यावेळी परवेज व फरहान हे दोघे आपली ऑटोरिक्षा घेऊन तेथे आले. ‘आम्हीही मारिहाळकडे जात आहोत. त्यामुळे आमच्या रिक्षात बसा’ असे सांगत राजेंद्र यांना ऑटोरिक्षात बसवून घेतले.

ऑटोरिक्षा अमननगरजवळ पोहोचताच एका खुल्या जागेवर नेऊन राजेंद्र यांच्या खिशातील 5 हजार रुपये रोख असलेली पर्स, 15 ग्रॅमची सोन्याची चेन, दोन एटीएम कार्ड, आधार व पॅनकार्ड व सेनादल निवृत्तीचे आयडेंटीटी कार्ड आदी साहित्य हिसकावून घेऊन या जोडगोळीने तेथून पलायन केले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा माळमारुती पोलीस स्थानकात भादंवि 394 अन्वये एफआयआर दाखल आला होता. तेव्हापासून परवेज फरारी होता. माळमारुती पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 रोजच्याच लुटमारीच्या घटना

फरशीने हल्ला करून माजी सैनिकाला लुटण्यात आले होते. ऑटोरिक्षा मारिहाळ नेण्याऐवजी ‘साहेब अमननगरला आमचे थोडे काम आहे. ते झाल्यानंतर मारिहाळला जाऊ’ असे सांगत या दोघा जणांनी माजी सैनिकांना अमननगरला नेले होते. सांबरा रोड, न्यू गांधीनगर परिसरात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. या गुन्हेगारांनी आणखी कोणाला धमकावून किंवा मारहाण करून लुटले असतील तर संबंधितांनी माळमारुती पोलीस स्थानकाशी 9480804107 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.