बेळगाव रेल्वेस्थानकावर नवा फूट ओव्हरब्रिज
कोणत्याही प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे प्रवाशांना होणार सोयीचे
बेळगाव : अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेतून बेळगावमधील चारही प्लॅटफॉर्मना जोडण्यासाठी बेळगाव रेल्वेस्थानकात फूट ओव्हरब्रिज उभारला जात आहे. मुख्य प्रवेशद्वारानजीक 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी तात्पुरत्या स्वरुपात सुरू असलेल्या प्रवेशद्वाराच्या परिसरातच सध्या माती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. 1 वरून 2 व 3 साठी लोखंडी फूट ओव्हरब्रिज काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. परंतु, आता हा ब्रिज जुना झाला असल्याने या ठिकाणी नवा फूट ओव्हरब्रिज उभारला जाणार आहे. मुंबई, बेंगळूरप्रमाणे फूट ओव्हरब्रिजची रचना केली जात आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे ठरणार आहे.
नवीन फूट ओव्हरब्रिज 50 मीटर लांब व 12 मीटर रुंद असणार आहे. फूट ओव्हरब्रिजला एक्सलेटर (सरकता जिना), लिफ्ट, रॅम्प व जिनेही जोडले जाणार आहेत. ओव्हरब्रिजचे बांधकाम जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा फूट ओव्हरब्रिज मुख्य प्रवेशद्वारापासून लांब आहे. त्यामुळे चौथ्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर चढताना व उतरताना गैरसोय होत आहे. यासाठी हा नवा फूट ओव्हरब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मागील महिन्याभरापासून हे काम सुरू करण्यात आले आहे. या नव्या ब्रिजमुळे पहिल्या प्लॅटफॉर्मवरून चौथ्या प्लॅटफॉर्मपर्यंत ये-जा करणे सोयीचे होणार आहे.