मुंबई, हैदराबादसाठी नवी विमानसेवा
प्रतिनिधी/ बेळगाव
विमानतळ प्राधिकरणाने हिवाळी हंगामातील वेळापत्रक जाहीर केले असून यामुळे बेळगावच्या वाट्याला मुंबई व हैदराबाद या दोन शहरांना थेट विमानसेवा जाहीर करण्यात आली आहे. इंडिगो एअरलाईन्सला मुंबई व हैदराबाद या दोन मार्गांवरील सेवा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या दोन्ही शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू होणार आहे.
26 ऑक्टोबर ते 28 मार्च 2026 या कालावधीसाठी विमानतळ प्राधिकरणाने हिवाळी हंगामातील विमानफेऱ्या जाहीर केल्या आहेत. सध्या बेळगावमधून इंडिगो व स्टार एअरलाईन्स सेवा देत आहेत. यापूर्वी मुंबई व हैदराबाद या दोन्ही शहरांना विमानसेवा उपलब्ध होती. ती आठवड्यातील काही मर्यादित दिवस असल्याने प्रवासी क्षमता कमी होती. परंतु, आता इंडिगो एअरलाईन्सला हा मार्ग मंजूर झाल्यामुळे विमानसेवा विस्तारली जाण्याची शक्यता आहे.
स्टार एअरलाईन्सकडून मुंबई, अहमदाबाद, बेंगळूर व जयपूर या मार्गांवर सेवा दिली जात आहे. तर इंडिगोकडून दिल्ली, हैदराबाद व बेंगळूर या शहरांना सेवा दिली जात आहे. आता इंडिगोकडून मुंबई व हैदराबाद या शहरांना दररोज विमानफेरी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.