काळादिनाच्या फेरीतून म. ए. समितीला नवी ऊर्जा
तरुणाई पुन्हा सीमालढ्यात सक्रिय : योग्य मार्गदर्शनाची गरज
बेळगाव : काळादिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. प्रशासन तसेच पोलिसांनी बंधने लादूनही मराठी भाषेच्या अस्मितेसाठी युवक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आजही तरुणांच्या मनातील भाषेविषयीची आस्था व प्रेम पूर्वीइतकेच आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला 1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीमुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले. मध्यंतरीच्या काळात महानगरपालिका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये म. ए. समितीची पिछेहाट झाली. त्यामुळे तरुणाई सीमाप्रश्न तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीपासून दूर चालली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. समितीतील अंतर्गत दुही, शह-काटशहाचे राजकारण, आपले वर्चस्व मिळविण्यासाठीचा खटाटोप यामुळे काही कार्यकर्ते चळवळीतून बाहेर गेल्याचे आरोप होऊ लागले. परंतु, हे केवळ म. ए. समितीतच आहे असे नाही. राजकीय पक्ष असो किंवा संघटना त्यामध्ये वेगवेगळे प्रवाह हे असतातच. एकाच पक्षात राहून एकमेकांविरोधात कुरघोडीही केली जाते. त्यामुळे केवळ म. ए. समितीमध्येच हे होते असे नाही.
राष्ट्रीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या पदांमुळे काही जणांनी वेगळा मार्ग निवडला. परंतु, आजही त्यांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयीची अस्मिता तसूभरही कमी झालेली दिसत नाही. शनिवारी झालेल्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीमध्ये वयोवृद्धांपेक्षा 20 ते 45 वयोगटातील तरुणांची संख्या 80 टक्क्यांहून अधिक होती. त्यामुळे तरुण लढ्यापासून दुरावले गेले आहेत, असे खोटे आरोप यापुढे कोणाला करता येणार नाहीत. युवावर्गाची डोकी भडकवून त्यांना पदांची प्रलोभने देऊन आपल्याकडे घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. परंतु बेळगावमध्ये प्रशासनाकडून भाषिक अत्याचार कसे होत आहेत? हे त्यांनी पाहिल्यानंतर ते पुन्हा म. ए. समितीकडे वळू लागले आहेत. एखादा व्यवसाय, उद्योग चालवताना प्रशासनाकडून होणाऱ्या अरेरावीला कंटाळून अखेर दाद मागण्यासाठी म. ए. समितीकडेच यावे लागते, हे तरुणाईला आता समजून चुकले आहे.
आता जबाबदारी नेतृत्वाची
मध्यंतरीच्या काळात म. ए. समितीपासून दुरावलेली युवापिढी पुन्हा लढ्याशी जोडली जात आहे. या युवापिढीला म. ए. समितीसोबत घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाने सक्षमपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. युवक लढ्यापर्यंत आले, परंतु त्यांना पुढील दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी म. ए. समितीच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणाईला पुढील प्रत्येक लढ्यामध्ये सन्माननीय सहभाग मिळवून द्यावा, अशी सामान्य सीमावासियांची अपेक्षा आहे.