सांगे मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा
दुर्गम भागांतील रस्त्यांपासून पर्यटन, आरोग्य व पाण्याच्या सुविधांपर्यंत कोट्यावधींची कामे
त. भा. प्रतिनिधी
सांगे : सांगे मतदारसंघाच्या विकासाला गती देताना दुर्गम भागांतील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शेती, पशुसंवर्धन, पर्यटन, हस्तकला आणि आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रांतील प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. सांगेचे आमदार तथा समाजकल्याण, पेयजल आणि इतर खात्यांचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने गेल्या काही काळात अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.
गोवा मुक्तीनंतर तब्बल 60 वर्षे रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केपे तालुक्यातील कावरेपिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रातील आणि सांगे मतदारसंघात समाविष्ट होणाऱ्या काजुकट्टा गावासाठी अखेर रस्त्याची सुविधा पुरविण्यात आली. डोंगराळ भागात असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी सुमारे सहा किलोमीटर पायपीट करावी लागत होती. पावसाळ्यात ओहोळांना पूर आल्यानंतर शिक्षणावरही परिणाम होत होता. पूर्वी येथील आजारी व्यक्तींना खुर्चीवर बसवून ती डोक्यावर घेऊन सहा किलोमीटरपर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर येत होती. ग्रामस्थांनी हा प्रश्न फळदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. सुमारे 7 कोटी 51 लाख ऊ. खर्चून हा रस्ता निर्माण करण्यात आला आहे.
काजूर ते कर्ला या रस्त्याच्या कामावर सुमारे 5 कोटी 62 लाख ऊपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचे कामही पूर्ण करण्यात आल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. काजूर, कर्ला, काजुगोटो, वेर्ले, साळजिणी आणि तुडव यांसारख्या दुर्गम गावांना रस्त्याच्या माध्यमातून जोडण्यावर भर देण्यात येत आहे. वेर्ले-साळजिणीदरम्यानच्या सुमारे 9 किलोमीटर रस्त्यासाठी 10 कोटी ऊ. खर्चाला मंजुरी मिळाली असून साळजिणी रस्त्यासाठी सुमारे 11 कोटी ऊपयांची निविदा काढण्यात आलेली आहे.
याशिवाय सांगे-तेमचोवाडा येथील श्री पाईकदेव मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे 20.46 कोटी रु. खर्चाचा पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. फळदेसाई यांनी सांगितले की, दुर्गम भागातील नागरिकांनी अनेक वर्षे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष केला आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही शंभर टक्के निकाल मिळविलेला असून आता या भागांतील रस्त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येत आहे.
साळावली जलशुद्धिकरण प्रकल्पाला गती
साळावली येथील विस्तारित जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी कामाचा आढावा घेतला. विद्यमान 100 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पात आणखी 100 एमएलडी क्षमता वाढविण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्सकडून ते करण्यात येत आहे. या प्रकल्पात ‘झायलम’ कंपनीची अंडर-ड्रेनेज फिल्टरेशन सिस्टम’ वापरण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्यातील विविध अशुद्धी दूर करण्याबरोबरच ‘बॅकवॉश प्रक्रिये’तून पाण्याचा अपव्यय कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पारंपरिक ‘फिल्टरेशन’च्या तुलनेत या प्रणालीची कार्यक्षमता अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
फळदेसाई यांनी पेयजल खाते हाती घेतल्यानंतर राज्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलणे, पाणी गळती रोखणे, पाणी चोरीवर नियंत्रण आणणे आणि पाण्याचे मोजमाप करण्यासाठी सुमारे 900 वॉटर फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन करण्याचा विचार चालू झाला आहे. अनेक ठिकाणी जुन्या सिमेंटच्या जलवाहिन्यांमुळे गळती होत असून त्या बदलण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.