For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवे डिजिटल चकवे

06:30 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
नवे डिजिटल चकवे
Advertisement

तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ, विश्वासार्ह, कमी खर्चाचे करण्यासाठी होत असतो. यामध्ये पैशाचा वापर, व्यवहार ही नेहमीची व सर्वव्यापी बाब आता डिजिटल तंत्र वापराने खूपच सुलभ होत आहे. पण याची दुसरी बाजू फसवणुकीची असून हे नवे अर्थचकवे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. स्मार्टफोनचा वापर हे ई-चोर अधिक कुशलतेने करीत असून त्यांच्या कार्यपद्धती समजून घेतल्यास आपणास अशी फसवणूक टाळता येणे शक्य होते. ही सजगता,  सावधानता जशी महत्त्वाची आहे तसेच आपली फसवणूक झाल्यानंतर तक्रार नोंदवणे पद्धत माहीत असणे आवश्यक असते.

Advertisement

याबाबत बँका, वित्तसंस्था, सेबी यांच्यामार्फत सतत सूचना, माहिती व खबरदारीचे उपाय प्रसारीत केले जात असले तरी अशा फसवणुकीचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत अशा फसवणुकीचे प्रमाण आठपटीने वाढले असून यात महाराष्ट्राचा वाटा 25 टक्के इतका आहे. 2024 मध्ये 78000 प्रकरणे होती ती 2025 मध्ये 2,92,800 झाली. तर यामध्ये झालेली फसवणूक 421 कोटी वरून 2054 कोटी होती. बँक फ्रॉड प्रकरणे 18461 वरून 2,92,800 अशी वाढली. आपण सजगतेने, सावधानतेने व्यवहार करणे हीच त्यावरील उपाययोजना असून प्रथम फसवणुकीचे प्रकार समजून घेऊ व नंतर सावधानतेचे मार्ग पाहू.

डिजिटल अरेस्ट- पोलिसांकडून पकडले जाणे, अटक होणे हे सर्वसामान्य माणसाप्रमाणे प्रतिष्ठित व्यक्तींनाही अपमानकारक, भयावह वाटते. नेमक्या याच ‘भय’ मानसिकतेचा वापर करीत ‘डिजिटल अरेस्ट’ हे नवे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. यासाठी आवश्यक तंत्र व यंत्र चीनमार्फत पुरवली जातात. डिजिटल अरेस्टची कार्यपद्धती अत्यंत प्रगत व वास्तवदर्शी असल्याने केवळ या प्रकारातून दर महिन्यास हजारो कोटींची फसवणूक होत आहे. केवळ गत महिन्यात कोल्हापुरातून 3.57 कोटी तर बीडमधून 84 लाखाची फसवणूक डिजिटल अरेस्टमधून झाली. याची कार्यपद्धती अशी असते. प्रथम ज्यांना डिजिटल अरेस्ट करावयाचे त्यांचा सखोल अभ्यास केला जातो. यासाठी सोशल मीडिया त्यांना आवश्यक माहिती पुरवतो. ही मोठी साखळी असते. त्यासाठी सावज भक्कम लागते. आता प्रत्यक्ष कार्यवाही, व्हॉटसअपवरून आपण कस्टम अधिकारी बोलत असून तुमच्या नावे अंमलीपदार्थ तस्करीचे पॅकेट सापडले आहे. (फोटो दाखवला जातो.) या कारणासाठी तुम्हाला तात्काळ मुंबईच्या पोलीस स्टेशनला हजर व्हावे लागेल. जर हे शक्य नसेल तर...तुम्ही डिजिटल अरेस्ट पत्करू शकता. तुमच्या नावाचे अटक वॉरंट व्हॉटसअपवर दाखवत आहोत. निर्णय तात्काळ घ्या.’ असा धमकीचा कॉल केला जातो. व्यक्ती भयग्रस्त होऊन डिजिटल अरेस्ट स्वीकारते व खेळ आता सुरु होतो! कस्टम अधिकारी तात्काळ पोलिस अधिकाऱ्याकडे फोन ट्रान्स्फर करतात. येथे सेटअप महत्त्वाचा असतो.

Advertisement

ऑफिस रचना खरी वाटेल अशीच असते! डिजिटल अरेस्टमध्ये तुम्ही घरीच एका खोलीतच थांबायचे. मोबाईल कॅमेरा ऑनच ठेवायचा. टॉयलेटसाठी जातानाही मोबाईल कॅमेरा चालूच हवा. अन्यथा प्रत्यक्षात अटक करावी लागेल, अशी धमकी दिली जाते. डिजिटल अरेस्टमधून मुक्त होण्यासाठी मोठी रक्कम हस्तांतरीत करण्यात ऑनलाईन व्यवहार करण्यास भाग पाडतात. मोठी रक्कम एफडी, अन्य कर्जे यातून देण्यास भाग पाडले जाते. बँकेतून मोठी रक्कम काढताना जर बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारण विचारले तर नातेवाईकांच्या उपचार खर्चास हवेत, असे सांगण्यास सांगितले जाते! मुख्य म्हणजे यातील सर्व रक्कम तात्काळ देशात व विदेशात पाठवली जाते. ही गँग मोठी असल्याने पोलिस तपासात अडचण येते. यातील वास्तव असे की डिजिटल अरेस्ट हा प्रकार पोलिस करीत नाहीत! अशा कॉलना न घाबरता ते बंद करावे.

स्टेग्नोग्राफी (एtाgहदुज्प्ब्)-नवतंत्राचा वापर अत्यंत कौशल्याने फसवणुकीसाठी कसा होतो हे डिजिटल फसवणूक प्रकारातून स्पष्ट होते. व्हॉटसअप हे आता सवयीचे साधन झाले असून ते एक अत्यंत प्रभावी समाजमाध्यम आहे. व्हॉटसअपवर एका व्यक्तीचे चित्र पाठवले जाते व आपण यांना ओळखता का असे विचारले जाते. जर आपण प्रतिसाद दिला नाही तर

कॉलवर विचारले जाते. ही व्यक्ती आपल्या परिचयाची असू शकते या भावनेतून जर त्यावर क्लिक केले तर त्यातून स्पायवेअर किंवा इतर सॉप्टवेअर आपल्या अपरोक्ष डाउनलोड होते आणि आपली सर्व माहिती, पासवर्ड, बँक तपशील चोरले जातात. यासाठी आपण अनोळखी व्हॉटसअपला प्रतिसाद न देणे व ऑटो डाउनलोड हे सेटींगमधून बंद करणे आवश्यक ठरते!

कुरियर स्कॅम- अनेक वस्तुंची ऑनलाईन खरेदी हे आता केवळ तरुण पिढीचे वैशिष्ट्या राहिले नाही. औषधापासून मोबाईलपर्यंत ऑनलाईन घेतले जाते. त्या वस्तुचे पॅकेज आपण कचऱ्यात टाकून देतो. या पॅकेजवरील आपली माहिती कुरियर

स्कॅमचा आधार बनते. अशा कचऱ्यात टाकलेल्या पॅकेजवरून तुम्हाला दुसरे कुरियर पाठवले जाते. आपण आपला पत्ता, मोबाईल, नाव व्यवस्थित असल्याचे पाहून गोंधळात पडतो. कुरियर आपण नाकारतो अशावेळी कुरियर देणारा कुरियर रद्द करण्यास कंपनीच्या क्रमांकावर कॉल करण्यास सांगतो. कुरियर रद्द करण्यास आपण कॉल केला की, आपल्या खात्यावरून रक्कम चोरणे सुरु होते! यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे ऑनलाईन वस्तू घेतल्यावर रॅपरवरील आपली माहिती फाडून टाकणे योग्य ठरते.

ईमेल, एसएमएस स्कॅम- ईमेलचा वापर करून जे स्कॅम होतात त्यांना नायजेरीयन स्कॅम म्हणतात. आपणास बक्षिस मिळाले आहे, नोकरी मिळणार आहे, असे फायदा देणारे ई मेल, एसएमएस, कॉल हे (विशिंग, फिशिंग) जरी जुने तंत्र असले तरी अद्यापि त्याचा वापर होत आहे. फार आकर्षक ऑफर या फसव्याच असतात हे विसरता कामा नये. बँकिंग फ्रॉडमध्ये ओटीपी स्कॅम आता घटला असला तरी वापर सुरू आहेच. आपली प्रतिमा, फोटो मॉर्फींग करून फसवणे ए. आय. वापराने शक्य होत आहे. आपली परिचित व्dयाक्ती व्हिडीओ कॉल करून पैसे पाठवण्याची विनंती करते असे याचे स्वरुप असते.

मल्टीलेव्हल मार्पेटिंग (एमएलएम) स्कॅम व्यवसायाचा बुरखा घेऊन केले जातात. जपानी गादीसारखे स्कॅम यामध्ये येतात. शेअर बाजारात भरपूर नफ्याचे/परताव्याचे आश्वासन देणारे स्कॅम प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहेत. सावधानता व तक्रार नोंद- मोबाईल व इंटरनेट यांच्या वापरात सावधानता, निर्णय घाईने न घेणे, अति आकर्षक टाळणे, अधिकृत व सुरक्षित संकेतस्थळे वापरणे, आपला मोबाईल, लॅपटॉप, अपग्रेड ठेवणे, सुरक्षा सॉफ्टवेअर वापरणे या सावधानता  महत्त्वाच्या ठरतात. पण महत्त्वाचे म्हणजे फसवणूक झाल्यानंतर शक्य तेवढे लवकर तक्रार ऑनलाईन करणे आवश्यक असते. (इथे ही फसव्या वेबसाईट कार्यरत आहेत!) इ.एफ.आय.आर.सुविधा वापरणे आवश्यक आहे. 1940 ही सायबर क्राईम नोंदणीस उपलब्ध आहे. वित्तीय गुन्हे जर शेअरबाजार निगडीत असेल तर स्कोर ही वेबसाईट मदतीस आहे. बँकिंग फ्रॉड संबंधित बँक शाखेत नोंदवावा लागतो. जर 4 तासाच्या आत फ्रॉड नोंदवला तर आपली नुकसान भरपाई 90 ते 95 टक्के होऊ शकते!

-प्रा. डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :

.