‘स्मार्ट सिटीला’ नवी ‘डेडलाईन’!
90 टक्के कामे पूर्ण, 31 मे पर्यंत राजधानी पणजी होणार चकाचक
पणजी : स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राजधानीत सुरू असलेली विकासकामे त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून न्यायालयाला दिलेल्या प्ति ज्ञापत्रानुसार ती पूर्ण करण्याकडे आमचा कल आहे. त्यादृष्टीने सर्व प्रमुख पायाभूत सुविधांच्या कामांसाठी दिलेली 31 मार्चची मुदत पूर्ण केली आहे. आता केवळ 10 टक्के कामे शिल्लक राहिली असून पुढील दोन महिन्यात अर्थात 31 मे पर्यंत ती कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांनी दिली.
काल मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून आतापर्यंत पूर्ण झालेल्या तसेच पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञानुसार रस्ते आणि सांडपाणी अंतर्गत सर्व प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
आल्तीनो भागात 900 मीटर सीवरेज लाईन टाकण्यात येऊन 31 मॅनहोल, 4 अंतर्गत जोडण्या आणि 28 घरगुती जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच मळा, ऊआ दे ओरेम आणि मिरामार येथे मलनिस्सारणचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. ताड माड मंदिर ते टोंक येथील एसटीपीपर्यंत चालू मलनिस्सारण प्रकल्प हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा उपक्रम आहे ज्यामध्ये 200 मीटरपेक्षा जास्त लांबीची 710 मिमी व्यासाची मुख्य ट्रंक सीवरेज लाईन बसवणे समाविष्ट आहे. यापैकी 190 मीटर पूर्ण झाले आहेत आणि उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. या सर्व पैलूबाबत न्यायालयात एक नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.
यापुढे कोणताही रस्ता बंद नसेल
स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दि. 1 एप्रिलनंतर राजधानीच्या मध्यवर्ती भागात कोणतेही रस्ते बंद करण्यात आलेले नाहीत. तसेच बॅरिकेडिंग, खुले खंदक किंवा अन्य कोणतेही खोदकामही सुरू नाही, याचा स्मार्ट सिटीकडून पुनऊच्चार करण्यात आला आहे. तसेच असे एखादे काम सुरू असेल तर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत चाललेल्या कामांशी त्याचा संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जून अखेरपर्यंत पणजी हिरवळीने सजणार
मध्यवर्ती पणजीत पहिल्या टप्प्यात 6,850 मीटर तर दुसऱ्या टप्प्यात 1,024 मीटर आणि तिसऱ्या टप्प्यात 1,415 मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्यात काँक्रीटचा शेवटचा थर, रस्त्याचे रंगकाम आणि वाहतूक चिन्हे बसवण्यासह 31 मे पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 1 ते 30 जून पर्यंत लँडस्केपिंग आणि वृक्षारोपण केले जाईल, ज्यामुळे हिरवळ वाढेल आणि वनस्पतींचे चांगले अस्तित्व सुनिश्चित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
रायबंदर-पणजी रो-रो फेरी सेवा
रायबंदर येथे रो-रो फेरी सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या रॅम्पचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. शहराच्या स्वच्छता पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या उद्देशाने सांडपाणी व्यवस्था यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, त्यात प्रामुख्याने एमजी मार्ग आणि 18 जून मार्गजवळ 15 अंतर्गत जोडणी, भाटले भागात 16 मॅनहोल, 5 अंतर्गत जोडण्या आणि 40 घरगुती जोडण्यांचे काम पूर्ण झाले आहे.