सप खासदाराच्या विधानामुळे नवा विवाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रजपूत सम्राट राणा संग हा देशद्रोही होता, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी केले आहे. हे विधान त्यांनी शुक्रवारी संसदेत केले. राज्यसभेत केंद्रीय गृहविभागासंबंधी चर्चा होत असताना त्यांनी हे विधान केले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि इतर काही पक्षांचे सदस्य त्यांच्यावर तुटून पडले. भारतीय मुस्लीमांमध्ये बाबराचा अंश आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात. तथापि, भारतातील मुस्लीमांना बाबराशी काहीही देणेघेणे नाही. रजपूत राजा राणा संग यानेच बाबराला भारतात आणले, असा आरोप त्यांनी त्यांच्या भाषणात केला. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. भारतावर अत्याचार केलेल्या परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचे कारस्थान विरोधी पक्षांनी रचले आहे. राणा संग याच्यावरील आरोप खोटे आहेत. तो महान आणि देशभक्त सम्राट होता. त्याने अनेक रजपूत घराण्यांना एकत्र करुन साम्राज्य स्थापले होते. त्याच्यावर खोटे आरोप करणे हा रजपूत समाजाचा अपमान आहे. खोट्या विधानांमुळे सुमन यांनी देशाची क्षमायाचना करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे संजीव बाल्यान यांनी केली.