For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यवसायात नवनवीन बदल गरजेचेच

11:17 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्यवसायात नवनवीन बदल गरजेचेच
Advertisement

डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे सत्कार : असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Advertisement

बेळगाव : प्रिंटिंग व्यवसायामध्ये वेगळेपण आले आहे. कम्पोझिट, स्क्रीन प्रिंटिंग, ऑफसेट, पॅकेजिंग, डिजिटल अशा नव्या संकल्पना या व्यवसायामध्ये येत आहेत. त्यामुळे मुद्रकांनी आपली गती वाढविणे गरजेचे आहे. व्यवसायात टिकून राहायचे असेल तर नवीन बदल हे स्वीकारावेच लागतील. नवीन बदल करताना तरुणाईला यामध्ये सामावून घेणे गरजेचे आहे, असे विचार लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी मांडले. बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या सभेवेळी डॉ. किरण ठाकुर यांना पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट पदवी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना किरण ठाकुर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले, नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा व्यवसायात उतरलेले केव्हाही चांगले. प्रिंटिंग व्यवसाय हा जगातील एक मोठा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. लाखो नागरिकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. त्यामुळे परदेशात होणाऱ्या प्रदर्शनांमध्ये नवीन तंत्रज्ञान, सामग्री यांची माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती कुठेही मिळू शकते. अशा माहितीच्या आधारे नवीन व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखवा, असे आवाहन डॉ. ठाकुर यांनी केले.असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भातकांडे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष संतोष होर्तीकर यांनी 2023-24 सालचा जमा-खर्च सादर केला. ज्येष्ठ संचालक एन. बी. देशपांडे व अशोक धोंड यांनी संस्थेला कार्यक्रमांबाबत सूचना केल्या. प्रा. अनिल चौधरी यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर (बापू) जाधव यांनी केले. यावेळी रघुनाथ राणे, विलास सावगावकर, सतीश जाधव, अजित कोळेकर, शाम मांगले, महेंद्र सावगावकर, शिवाजी बाडीवाले, अरुण देसूरकर, शिवराज सावगावकर, सुनील शानभाग यांसह असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.