नाटो देशांकडून ट्रंप यांना नवे आव्हान
वृत्तसंस्था / लंडन
युरोपातील नाटो देशांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नवे आव्हान दिले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागलेल्या गाझा पट्टीची पुनर्बांधणी करण्याच्या अमेरिकेच्या योजनेला नाटो देशांनी विरोध केला आहे. तसेच अरब देशांनी गाझाच्या पुनर्बांधणीची योजना तयार केली असून या योजनेला मात्र नाटो देशांनी पाठिंबा दिला आहे. अरब देशांच्या योजनेला अमेरिकेने विरोध केला असून इस्रायलनेही ही योजना नाकारली आहे. अरब देशांनी या योजनेसाठी 53 अब्ज डॉलर्सचा खर्च करण्याचीही तयारी केली आहे. अरब देशांची योजना अधिक वास्तव असून त्यामुळे गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल. आज गाझा पट्टीतील लोकांचे जीवन हालाखीचे बनले आहे. अरब देशांच्या योजनेमुळे या लोकांनाही मोठा आधार मिळेल, असे नाटो देशांनी स्पष्ट केले आहे. तथापि, अरब देश त्यांची योजना इस्रायलच्या सहकार्याशिवाय क्रियान्वित करु शकणार नाहीत. कारण गाझा पट्टीवर इस्रायलचेच नियंत्रण आहे, या वस्तुस्थितीकडेही अनेक तज्ञांनी संबंधितांचे लक्ष वेधले आहे.