कांदा मार्केटमध्ये नवीन सीडी वर्कचे काम सुरू
महापालिकेने दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांतून समाधान
बेळगाव : दरवर्षी पावसाळ्यात कांदा मार्केटमध्ये गुडघाभर पाणी तुंबून रहात असल्याने त्याचा फटका भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिकेकडून तेथील जुनी सीडी फोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी मोठ्या आकाराची नवीन सीडी बांधली जाणार आहे. महापालिकेने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
अवकाळी पावसासह मान्सूनमध्ये दरवर्षी कांदा मार्केट व परिसरात पावसाचे पाणी तुंबून रहात असल्याने त्याचा फटका भाजीविक्रेते, व्यापारी व ग्राहकांना बसत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने गुडघाभर पाणी तुंबून रहात आहे. त्या ठिकाणची जुनी सीडी प्लास्टिक व कचऱ्याने तुंबली आहे. त्यामुळेच पाणी वाहून जाण्यासाठी वाट नसल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. स्थानिक नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी भाजीविक्रेत्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी कांदा मार्केट परिसरात पेव्हर्स बसविण्याचा संकल्प केला होता. मात्र, अद्यापही त्याला यश आलेले नाही.
लवकरच सीडीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न
पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेकडून त्या ठिकाणची जुनी सीडी फोडून लवकरात लवकर सीडीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न चे काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या आकाराची सीडी बांधली जाणार असून पावसाचे पाणी वाहून जावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरात लवकर सीडीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.