नवीन ‘आधार’ नोंदणी स्थगित
जन्मदाखल्यांवर ‘क्यूआर कोड’ नसल्याचा परिणाम
फोंडा : जन्म दाखल्यांवर क्यूआर कोड नसल्याने राज्यातील विविध आधार सेवा केंद्रांवऊन नवीन नोंदणी केलेली आधारकार्डे रिजेक्ट झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर नियोजन सांखिकी आणि मूल्यमापन संचालनालयातर्फे पंधरा दिवसांपूर्वी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाला लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. गोवा राज्यात उपलब्ध होणारे जन्म व मृत्यू दाखल्यांच्या ऑनलाईन सेवेसाठी नॅशनल इर्न्फोमेटिक सेंटरच्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. कर्नाटक व अन्य काही राज्ये या सेवेसाठी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचे सॉफ्टवेअर वापरतात.
रजिस्ट्रार जनरलच्या सेवेत क्यूआर कोडची सुविधा असल्याने नवीन आधार नोंदणीसाठी ही तांत्रिक अडचण येत नाही. त्यामुळे ही त्रुटी दूर करण्यासाठी नियोजन संचालनालयाने ऑनलाईन सेवा बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तोपर्यंत गोव्यातील या जन्मदाखल्यांच्या आधारे नोंदणी केलेली सर्व नवीन आधार अर्जदारांची नोंदणी स्थगित राहणार आहे. गेल्या ऑक्टोबरपासून ज्यांनी नवीन आधार कार्डसाठी नोंदणी केली होती, या सर्वांची नोंदणी रिजेक्ट झालेली आहे. ज्यामध्ये बहुतांश लहान मुले आहेत. सध्या नवीन आधार नोंदणी बंद ठेवण्यात आली असून ही तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतरच ती पूर्ववत सुरू होणार आहे.
नवीन आधार कार्ड बनविण्यासाठी जन्मदाखल्याची सत्य प्रत तसेच आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य आहे. याशिवाय आधार कार्ड नोंदणी होऊ शकत नाही. मात्र जन्मदाखल्यावरील क्यूआर कोड अभावी ही नोंदणी रिजेक्ट झाल्याने ही तांत्रिक अडचण गोव्यात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला येणार आहे. कारण गोवा राज्यात नोंदणी खात्यातून जे जन्मदाखले दिले जातात, त्यावर अद्याप तरी क्यूआरकोडची तरतूद केलेली नाही. त्यामुळे गेल्या ऑक्टोबरपासून नवीन नोंदणी केलेली अशी हजारो आधार कार्ड सध्या स्थगित आहेत.