नेवील टाटांचा सर दोराबजी टाटा ट्रस्ट संचालक मंडळात समावेश
मुंबई : टाटा ट्रस्टने चेअरमन नोएल टाटा यांचा मुलगा नेवील टाटा यांचा समावेश सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळामध्ये केला आहे. सदरची नियुक्ती ही 12 नोव्हेंबरपासून झाली असून पुढील तीन वर्षांसाठी ते मंडळात कार्यरत राहतील. या संदर्भातल्या प्रस्तावाला संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे.
यांचीही निवड
त्याचबरोबर टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन वेणू श्रीनिवासन यांनाही सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या ट्रस्टीपदी आणि उपाध्यक्षपदी निवडले गेले आहे. त्याचप्रमाणे टाटा समूहातील अनुभवी व्यक्तिमत्व असणारे भास्कर भट यांनाही संचालक मंडळामध्ये जागा दिली गेली आहे. या दोन्हींची नियुक्ती ही पुढील तीन वर्षासाठी केली जाणार असून 12 नोव्हेंबरपासून ते मंडळात कार्यरत झाले आहेत.
नियुक्ती व पुढील वाटचाल
नेवील टाटा हे नोएल टाटा यांचे छोटे चिरंजीव आहेत. ते पहिल्यापासूनच टाटा ट्रस्टच्या जेआरडी टाटा ट्रस्ट, आरडी टाटा ट्रस्ट, टाटा सोशल वेल्फेअर ट्रस्ट आणि टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या संचालक मंडळात होते. नेवील टाटा हे लवकरच सर रतन टाटा ट्रस्टच्या मंडळामध्ये सामील होऊ शकतात. यासंदर्भात मंगळवारी मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आलेली असली तरी या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.