ट्रम्प यांच्या नाराजीनंतर नरमले नेतान्याहू
इस्रायल आता लेबनॉनवर करणार नाही हल्ला : ट्रम्प यांचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी लेबनॉनची राजधानी बैरूतवरील मोठा सैन्य हल्ला रोखला असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. माझ्या आवाहनानंतर नेतान्याहू यांनी स्वत:च्या सैनिकांना परतण्याचा निर्देश दिला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. बेंजामीन नेतान्याहू यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. बैरूतवरील मोठा हल्ला टाळण्याची मी विनंती केली आणि त्यांनी स्वत:च्या सैनिकांना परतण्याचा निर्देश दिला असा दावा ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे.
ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील चर्चा अत्यंत तणावपूर्ण राहिली असल्याचा दावा अमेरिकेच्या माध्यमांनी केला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेसोबतची चर्चा समाप्त करण्याचा इशारा इराणने दिला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. हिजबुल्लाहने इस्रायलवरील हल्ले न रोखल्यास बैरूतमधील दहशतवादी अ•dयांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले होते.
हल्ले रोखले जाणार : ट्रम्प
हिजबुल्लाह नेतृत्वाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला असून त्यांनी इस्रायलवरील हल्ले रोखण्यास सहमती दर्शविली आहे. तर इस्रायलने देखील प्रत्युत्तरादाखल कारवाई रोखण्यावर सहमती दर्शविली आहे. ही व्यवस्था किती काळ चालते हे पाहुया असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
तणावपूर्ण वातावरणात चर्चा
ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील चर्चा तणावपूर्ण राहिल्याचा दावा अमेरिकन वृत्तसंकेतस्थळ एक्सियोसकडून करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्यावर दबाव टाकत हल्ले रोखण्याची मागणी केली, यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी सहमती दर्शविली असल्याचे समजते.