हमासच्या हल्ल्याबद्दल नेत्यान्याहूंना होती पूर्वकल्पना
वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा : इजिप्तने 2 दिवस अगोदर दिला होता इशारा : पंतप्रधानांनी माहिती लपविली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांना हमास या दहशतवादी संघटनेच्या 7 ऑक्टोबर 2023 पूर्वीच्या हल्ल्यापूर्वी अनेक इशारे मिळाले होते. इजिप्तने हल्ल्याच्या सुमारे 48 तासांपूर्वी पर्यंत इस्रायलला सतर्क केले होते असा दावा अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन प्रमुख अब्बास कामेल यांनी हल्ल्यापूर्वी नेतान्याहू यांच्या कार्यालयाला फोन केला होता.
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
इस्रायलला संभाव्य हल्ल्याचा इशारा मिळाला होता. नेतान्याहू यांनी हल्ल्यापूर्वी मिळालेली महत्त्वाची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना उपलब्ध केली नव्हती असा आरोप इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री योआव गॅलेंट यांनी एका मुलाखतीत केला आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा सीमा ओलांडून इस्रायलच्या समुदाय आणि सैन्यतळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे 1200 जण मारले गेले होते, तर जवळपास 5 हजार जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी सुमारे 250 जणांचे अपहरण केले होते.
इजिप्तने दिला होता सल्ला
इजिप्तने जून 2023 मध्येच इस्रायलला गाझामध्ये स्थिती बिघडण्याचा इशारा दिला होता. इजिप्तने इस्रायलला हमाससोबत अपहृत आणि कैद्यांच्या अदलाबदलीवरून चर्चा पुन्हा सुरू करण्याचा सल्ला देखील दिला होता. सप्टेंबर महिन्यात इजिप्तचे गुप्तचर प्रमुख अब्बस कामेल यांनी इस्रायलचा दौरा केला होता. गाझामध्ये स्थिती बिघडत राहिली आहे आणि स्थिती कुठल्याही मोठ्या संकटात बदलू शकते असा इशारा त्यांनी दिला होता. तर स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा तेव्हा इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
चर्चेची माहिती लपविली
इस्रायल-हमास युद्धादरम्यान नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संवेदनशील मुद्द्यांवर झालेल्या चर्चेची माहिती देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नव्हती. युद्धादरम्यान मला अनेकदा नेतान्याहू यांच्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेविषयी कळले. अमेरिकेचे अधिकारी मला फोन करून चर्चेत बोलले गेलेलया गोष्टींच पुष्टी करण्याचा प्रयत्न करत होते. या चर्चेत ओलीस अन् दारूगोळा यासारखे संवेदनशील मुद्दे सामील होते. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना नेतान्याहू यांच्यावर भरवसा नव्हता असा दावा गॅलेंट यांनी केला आहे.
युएईच्या अध्यक्षांचा सतर्कतेचा इशारा
युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये नेतान्याहू यांना हमासच्या संभाव्य मोठ्या हल्ल्याविषयी सतर्क केले होते असा दावा यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने केला होता. युएईकडून देण्यात आलेला हा इशारा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेच्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचला नव्हता असा दावा इस्रायलच्या 5 माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. तर नेतान्याहू यांनी युएईशी निगडित इशाऱ्यांच्या आरोपांना नाकारले होते. तर इजिप्तचे गुप्तचर प्रमुख कामेल यांच्याशी थेट संवाद झाल्याचा दावा नेतान्याहू यांनी यापूर्वीच नाकारला आहे.
टाइमलाइन
जून 2023
?इजिप्तने गाझामधील वाढत्या तणावाबद्दल इस्रायलला केले होते सतर्क
सप्टेंबर 2023
?इजिप्तचे गुप्तचर प्रमुख अब्बास कामेल यांचा इस्रायल दौरा, परिस्थिती मोठ्या संकटात बदलू शकते असा इशारा.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला
?हल्ल्याच्या काही दिवस आधी अब्बास यांनी नेतान्याहू यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्याचा दावा.
हल्ल्याच्या 48 तासांपूर्वी
?इजिप्तकडून पुन्हा संभाव्य हल्ल्याबाबत सावध करण्यात आले. गाझामधून धोर्वा निर्माण होणार असल्याचे कळविले.