नेताजी जाधव यांचा आज अमृतमहोत्सव सोहळा
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती
बेळगाव : माजी नगरसेवक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकनिष्ठ, ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच विविध संघ-संस्थांचे आधारस्तंभ नेताजी नारायणराव जाधव यांचा अमृतमहोत्सव सोहळा गुरुवार दि. 16 रोजी सकाळी 10 वा. मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री व विधानसभा सदस्य जयंतराव पाटील उपस्थित राहणार आहेत.
नेताजी जाधव हे सीमाप्रश्नाच्या चळवळीतील लढवय्ये नेते आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यासाठी गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. सीमाभागातील समितीसाठी धडपडणाऱ्या एका सच्च्या कार्यकर्त्याच्या अमृतमहोत्सवाला येण्यास सहमती माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे या अमृतमहोत्सव सोहळ्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
नेताजी जाधव यांनी बेळगावच्या सामाजिक, सहकार, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढ्यात ते हिरीरीने सहभागी झालेले आहेत. म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शहापूर, वडगाव, परिसरात त्यांनी अनेक संघ-संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य केलेले आहे. विविध संघ-संस्थांचे कार्य करत आहेत. याचबरोबर नवी गल्ली, शहापूर बलभीम व्यायाम शाळा जीर्णोद्धार मंडळाचे अध्यक्ष, गल्लीतील ज्येष्ठ पंच, साई गणेश सोसायटीचे संस्थापक अशा विविध संघ व संस्थांच्या माध्यमातून ते अहोरात्र समाज हितासाठी झटत असतात.
मराठी भाषा आणि संस्कृती जतनासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत. एक व्यक्ती इतक्या संघ संस्थांशी जोडून निष्ठेने कार्य करते त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असेच आहे. नेताजी जाधव यांचे जीवन सर्वांसाठी आदर्श असे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेताजी नारायणराव जाधव अमृतमहोत्सव समितीच्यावतीने गुरुवारी अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याची गेल्या 15 दिवसांपासून समितीच्यावतीने तयारी करण्यात आली आहे.
अमृतमहोत्सव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष व अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे राहणार आहेत. मराठा को-ऑप. बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, बेळगाव बेकर्स को-ऑप. सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक शिवाजीराव हंगिरकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची नेते मंडळी, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे नेताजी जाधव अमृतमहोत्सव समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.