जपानमधून भारतात आणावेत नेताजी बोस यांचे अवशेष
बोस यांच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना आवाहन
कोलकाता : स्वातंत्र्यलढ्याचे नायक सुभाषचंद्र बोस यांची गुरुवारी देशभरात जयंती साजरी करण्यात आली. याचदरम्यान नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ यांनी स्वत:च्या पित्याचे अवशेष जपानच्या टोकियोमधून भारतात आणले जावेत, असे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. दशकांपर्यंत भारत सरकार नेताजी बोस यांचे अवशेष देशात आणण्यासाठी टाळाटाळ करत राहिले किंवा नकार देत राहिले. नेताजींचे अवशेष मागील 8 दशकांपासून टोकियो येथील रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आले असल्याचे अनिता बोस यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे. 2016 मध्ये नरेंद्र मोदी सरकारकडून सार्वजनिक करण्यात आलेल्या दस्तऐवजांनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ऑगस्ट 1945 मध्ये एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे पूर्वीच्या सरकारांचे मानणे होते, परंतु सार्वजनिक प्रतिक्रियेच्या भीतीपोटी हा निष्कर्ष कधीच सार्वजनिक करण्यात आला नव्हता. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दबावामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला असता तर नेताजींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असती. यामुळे भारतरत्न देण्याचा निर्णय मागे घेण्यात आला होता.