‘नेस्ले’चा नफा 6 टक्क्यांनी वाढला
जून तिमाहीमधील आकडेवारी : तेजीसह नफा 746 कोटींवर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी नेस्ले इंडिया लिमिटेडचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये निव्वळ नफा एप्रिल-जून तिमाहीत 6.9 टक्क्यांनी वाढून 746.60 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नेस्ले इंडियाने शेअर बाजाराला यासंबंधीची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 698.34 कोटी रुपये होता. तिमाहीत उत्पादन विक्रीतून नेस्ले इंडियाचा महसूल 3.75 टक्क्यांनी वाढून 4,792.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 4,619.50 कोटी रुपये राहिल्याची माहिती आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण खर्च 2.7 टक्क्यांनी वाढून 3,844.01 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नेस्ले इंडियाची देशांतर्गत विक्री एप्रिल-जून तिमाहीत 4.24 टक्क्यांनी वाढून 4,608.50 कोटी रुपयांवर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत 4,420.77 कोटी रुपये होती. दुसरीकडे कंपनीचे एकूण उत्पन्न 3.64 टक्क्यांनी वाढून 4,853.07 कोटी रुपयाच्या घरात पोहोचले असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.