नेपाळच्या लोकप्रतिनिधींना म'श्वरच्या स्ट्रॉबेरीची भुरळ
महाबळेश्वर :
भारतीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत नेपाळमधील लोकप्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ महाबळेश्वर तालुक्यातील शेती पद्धती अभ्यासण्यासाठी आले होते. या शिष्टमंडळाचे समन्वयक म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे डॉ. अंजन कुमार उपस्थित होते. तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे संस्थेचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी देखील उपस्थित होते. सोबतच महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी मंडळ कृषि अधिकारी कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक आणि ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्याची सुरुवात महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर गावातून करण्यात आली. खिंगर येचील प्रगतशील शेतकरी राजेंद्र नारायण दुधाणे यांच्या शेतीची पाहणी करण्याकरिता शिष्टमंडळ खिंगर येथे पोहोचले.
सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत राजेंद्र दुधाणे यांचे कुटुंबियांकडून महाराष्ट्रीयन परंपरेनुसार गंध लावून व वारकरी संप्रदायाचे निशाण असलेली टोपी घालून करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यापुढे डॉ. कलशेट्टी यांनी आलेल्या लोकप्रतिनिधींना महाबळेश्वर तालुक्याबद्दल संपूर्ण माहिती देत कार्यक्रमाची रुपरेषा समजावून सांगितली. तसेच राजेंद्र दुधाणे यांनी लागवड केलेल्या सर्व पिकांची माहिती दिली.
खिंगर गावचे ग्रामस्थ महादेव दुधाणे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील पाण्याची कमतरता आणि त्याअभावी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या तसेच किती अडचणी आल्या तरी तालुक्यातील शेतकरी कसे सर्व अडचणींना तोंड देऊन संघर्ष करून शेती करतात हे त्यांनी सांगितले आणि पिकासाठी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय करावा अशी विनंती त्यांनी केली.
यानंतर परराष्ट्र मंत्रालयातून प्रतिनिधी म्हणून आलेले डॉ. अंजन कुमार यांनी भारत आणि नेपाळ देशातील साम्य संस्कृतीतील साम्य आणि नागरिकांप्रती असलेले प्रेम याबद्दल बोलून विचारांची देवाणघेवाण केली.
तसेच लोकप्रतिनिधींना राजेंद दुधाणे यांच्या शेतमधील स्ट्रॉबेरी, गूजबेरी, रासबेरी, मलबेरी आणि ब्राझिलियन व्हाइट मलबेरी व संजय किसन दुधाणे यांचे शेतावरील ब्ल्यू बेरी पिके दाखवून त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. लोकप्रतिनिधींना ही भेट महत्त्वपूर्ण वाटली तसा त्यांनी अभिप्रायही दिला. सोबतच सर्व बेरी पिके नेपाळमध्ये लागवड करण्याच्या दृष्टीने आवड व्यक्त केली.
खिंगर येथील प्रक्षेत्र भेट झाल्यानंतर गोडवली येथे निलेश नामदेव मालुसरे यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उभारलेले 'सह्याद्री हनी व गुलकंद युनिटला भेट देऊन या युनिटबद्दल माहिती घेतली.
ही भेट झाल्यानंतर नेपाळ लोकप्रतिनिधी पैकी महापौर महेश तपालिया यांनी त्यांस आणि नेपाळमधील सर्व शेतकरी बांधवांना या प्रक्षेत्र भेटीचा कशा प्रकारे फायदा होऊ शकेल हे सांगितले. आणि आज झालेली भेट ही त्यांच्यासाठी निश्चितच खूप फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.