नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांचा राजीनामा
3 आठवड्यातच भ्रष्टाचाराचे आरोप : बालेन शाह सरकार अडचणीत
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारबद्दल जनतेत रोष निर्माण झाला आहे. याचदरम्यान नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी स्वत:च्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला आहे. गुरुंग यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविण्यासमवेत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. तर गुरुंग यांनी राजीनाम्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून निवड केली होती. तर पद सांभाळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करवून चर्चेत आलेले गुरुंग हे मागील काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरले होते.
गृहमंत्री म्हणून मी प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. अलिकडच्या दिवसांमध्ये माझ्या संपत्तीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले, तसेच यासंबंधीच्या टिप्पणी आणि लोकांच्या चिंता मी गांभीर्याने घेतल्या आहेत. माझ्यासाठी पदापेक्षा मोठी गोष्ट नैतिकता आहे. सार्वजनिक जीवन स्वच्छ असावे आणि नेतृत्व उत्तरदायी असायला हवे असा संदेश जेन-झेड आंदोलनही देते. याचमुळे मी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे गुरुंग यांनी म्हटले आहे.
नेपाळचे बालेन शाह सरकार सातत्याने वादात सापडत आहे. बालेन शाह यांच्या सरकारला अजून महिना झालेला नसताना त्यांच्या विरोधत जनतेतील असंतोष वाढू लागला आहे. काठमांडू समवेत अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करत आहेत. नेपाळ सरकारने भारतातून येणाऱ्या सामग्रीवरील शुल्क वाढविल्याने सीमावर्ती भागातही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.