नेपाळचे पंतप्रधान करणार चीनचा दौरा
64 वर्षांची परंपरा खंडित होणार
वृत्तसंस्था/ काठमांडू
चीनचे गुलाम म्हणवले जाणारे नेपाळचे नवे पंतप्रधान के. पी. ओली आपल्या पहिल्या अधिकृत परदेश दौऱ्यावर चीनला जात आहेत. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. पी. ओली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चीनमध्ये जाणार आहेत. यापूर्वी नेपाळमध्ये अशी परंपरा होती की जो कोणी नवा पंतप्रधान बनतो तो प्रथम भारताला भेट देतो. मात्र, ओली यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक भारतविरोधी पावले उचलली होती. नेपाळचा वादग्रस्त नकाशा, अयोध्या प्रकरण यासंबंधीच्या ओली यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध रसातळाला गेले होते. आता केपी ओली पुन्हा पंतप्रधानपदी परतले असताना भारताने त्यांना महत्त्व दिलेले नाही. भारतातील नरेंद्र मोदी सरकारने के. पी. ओली यांना अधिकृत निमंत्रणही दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी भारताकडे दुर्लक्ष करत चीनला भेट देण्याची तयारी दर्शवल्यामुळे 64 वर्षांची परंपरा खंडित होणार आहे.
के. पी. ओली यांनी पदभार स्वीकारून 4 महिने झाले असले तरी भारताने शांतता पाळली आहे. भारताच्या थंड वृत्तीचे कारण नवी दिल्लीच्या धोरणांमध्ये झालेला बदल आहे, असे मानले जाते. चीनने के. पी. ओली यांना 2 ते 6 डिसेंबर दरम्यान भेटीचे निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने या तारखेचा तपशील जारी केला असला तरी ओली यांनी अद्याप चीन दौऱ्याबाबत जाहीरपणे काहीही सांगितलेले नाही. त्यांच्या चीन दौऱ्याची तयारी सुरू झाल्याचे नेपाळी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.