नेपाळ पंतप्रधानांचे संसदेत ‘थँक्यू इंडिया’
महापुरावेळी मिळालेल्या मदतीबद्दल बालेन शाह यांनी मानले भारताचे आभार
मैत्रीचा हात...
- दुर्घटनेनंतर पहिल्याच दिवशी भारतातून पूरग्रस्तांसाठी मदत
- नेपाळ पंतप्रधानांचे दिल्लीच्या मैत्रीबद्दल आभारपूर्ण भाषण
- शेजारी देशांनी वेळेवर मदत पुरवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या जलप्रलय आणि महापुराच्या काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड विध्वंस झाल्यानंतर शेजारी देशांनी नेपाळला उदारपणे मदत केली आहे. महापुरानंतर विविध स्तरांवर नेपाळला उदार मदत देणाऱ्या देशांमध्ये भारत, चीनसह अनेक देशांचा समावेश होता. पंतप्रधान बालेन शाह यांनी बुधवार, 2 सप्टेंबर रोजी संसदेत बोलताना भारताचा प्राधान्याने उल्लेख केला. गेल्या आठवड्यात देशात झालेल्या मोठ्या आपत्तीच्या वेळी आंतरराष्ट्रीय मदत नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वेळेवर मदत सुनिश्चित करण्यासाठी नेपाळने खासगी क्षेत्रात इतर देशांशी समन्वय साधला. मात्र, भारत आणि चीन या शेजारच्या राष्ट्रांनी तातडीने मदत पुरवल्यामुळे अनेक गोष्टी वेळेवर शक्य झाल्याचे बालेन शाह यांनी सभागृहात जाहीर केले. बालेन शाह पहिल्या दिवसापासून आपत्ती व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मागत आहेत. जलप्रलय आल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून, भारत सातत्याने मदत पाठवत आहे. या मदतीमध्ये अन्न, औषधे, पूल बांधणीचे साहित्य आणि डीएनए तज्ञांच्या पथकाचा समावेश आहे.
माहिती प्रसारास झालेल्या विलंबावर स्पष्टीकरण
आपत्तीच्या काळात माहितीच्या अभावाबद्दल सरकारला प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना पंतप्रधान शाह यांनी लोकांना माहिती देण्यासाठी 11 लाख एसएमएस संदेश पाठवण्यात आल्याचे स्पष्ट करत वेळेवर माहिती न दिल्याचा आरोप फेटाळला. ही आपत्ती कल्पनेपलीकडची होती. सरकारला माहिती मिळताच 11 लाख नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवण्यात आली, असे ते म्हणाले. राज्य आणि स्थानिक पातळीवर समन्वय साधण्यात सरकारला आलेल्या अपयशाबद्दलच्या प्रश्नांना पंतप्रधानांनी उत्तर दिले. सध्या समन्वयातून मदत आणि बचावकार्य केले जात आहे. सुरुवातीपासूनच सर्व संबंधित देश बचावकार्यात सहभागी आहेत. बोगद्यांमधील बचावकार्यासाठी मोठ्या प्रमाणात तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असल्याने, सरकार आपल्या संसाधनांच्या मर्यादेत प्रयत्न करत असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
भारताकडून मदतसत्र सुरूच
26 ऑगस्ट रोजी तिबेटमधील हिमनदी फुटल्यामुळे नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळला मदत करत आहे. याचदरम्यान, बुधवारी भारताचे पाचवे मदत विमान नेपाळसाठी रवाना झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर केले. या विमानात 11 सदस्यीय बचाव पथक, विशेष बचाव उपकरणे आणि 5.5 टन अत्यावश्यक औषधे आहेत. भारताने आतापर्यंत नेपाळला 68 टनांहून अधिक मदत साहित्य आणि विशेष बचाव पथके पाठवली आहेत. पाठवलेल्या मदत साहित्यामध्ये ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्ज, मजबूत ताडपत्री, प्लास्टिक शीट्स आणि स्वच्छता किट यांचा समावेश आहे. तसेच अत्यावश्यक औषधे, अन्न पाकिटे, सौर दिवे, पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या आणि पोर्टेबल जनरेटर देखील पाठवण्यात आले आहेत.
सात दिवसांत सापडले 1,100 हून अधिक मृतदेह
26 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या पुरापासून बचावकार्य सुरू असून, मृतदेह सातत्याने बाहेर काढले जात आहेत. मंगळवार संध्याकाळपर्यंत 1,127 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मृतांचा आकडा अजूनही वाढणार आहे. सध्या नेपाळ पोलिसांच्या वेबसाइटवर बेपत्ता लोकांची संख्या 4,858 असल्याचे नमूद आहे. त्यातच शोधमोहीमही सुरू आहे. जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये अजूनही अनेक लोक अडकलेले असू शकतात. ओळख न पटलेले मृतदेह ठेवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांपैकी केवळ काहींचीच ओळख पटली आहे. डीएनए चाचणीद्वारे ओळख न पटलेल्या मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.