भारतीय चलनावरील बंदी नेपाळने हटविली
200 अन् 500 च्या नोटा नेण्यास आता मंजुरी : भारतीयांना मोठा दिलासा
वृत्तसंस्था, काठमांडू
नेपाळमधील बालेन शाह सरकारने भारतीय चलनावरील बंदी हटवत 200 आणि 500 रुपयांच्या नोटा देशात आणण्यास आणि बाहेर नेण्यास अनुमती दिली आहे. ही अनुमती नोव्हेंबर 2016 च्यानंतर जारी नोटांना असेल. यामुळे नेपाळला जाणाऱ्या भारतीयांसोबत सीमावर्ती भागातील नेपाळी लोकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. हे लोक सामग्री खरेदी करण्यासाठी सीमा पार करत असतात. भारताकडून नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी लागून केल्यावर नेपाळमध्ये केवळ 100 रुपयांच्या नोटाच आणण्याची आणि नेण्याची अनुमती होती.
बालेन शाह सरकारने आता भारतीय आणि नेपाळी नागरिकांना 200 आणि 500 रुपयांच्या नोटा बाळगण्यास मंजुरी दिली आहे. परंतु याचे कमाल मूल्य 25 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर 9 नोव्हेंबर 2016 पूर्वी जारी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटेवरील बंदी कायम राहणार आहे.
नेपाळ राष्ट्र बँकेने दिली माहिती
नेपाळ राष्ट्र बँकेने (एनआरबी) यासंबंधी माहिती दिली आहे. बँकेच्या अधिसूचनेनुसार वर्तमान नियमांच्या अंतर्गत नेपाळी आणि भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर 2016 नंतर जारी 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय चलनी नोटा नेपाळमध्ये नेऊ शकतात आणि तेथून परत आणू शकतात. परंतु या नोटांचे कमाल मूल्य प्रतिव्यक्ती 25 हजार रुपयांपर्यंत असावे लागणार आहे.
भारतातून आणू शकणार चलन
नव्या नियमांची व्याख्या स्पष्ट करत एनआरबीचे प्रवक्ते गुरुप्रसाद पौडेल यांनी नेपाळी नागरिक भारताच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशातून भारतीय चलन नेपाळमध्ये आणू शकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भारत वगळता अन्य कुठल्याही देशात ते नेपाळमधून भारतीय चलन नेऊ शकणार नाहीत.
भारतीय पर्यटकांना दिलासा
नव्या तरतुदीमुळे नेपाळमध्ये येणारे भारतीय पर्यटक तसेच भारतासोबत व्यापार करणाऱ्या नेपाळी नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. नेपाळी नागरिक आणि विदेशी पर्यटक कुठल्याही सीमाशुल्क घोषणेशिवाय 5 हजार डॉलर्स किंवा अन्य विदेशी चलनांमध्ये त्या समान रक्कम नेपाळमध्ये आणू शकतील. जर ही रक्कम 5 हजार डॉलर्सपेक्षा अधिक असेल तर आगमनावेळी सीमा शुल्क अधिकाऱ्यांसमोर त्याची घोषणा करणे अनिवार्य असेल.