For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये पुन्हा पूर-भूस्खलनाचा तडाखा, 6 ठार

06:31 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये पुन्हा पूर भूस्खलनाचा तडाखा  6 ठार
Advertisement

महिनाभरापूर्वी आलेल्या पुरात 1,453 बळी : 5,500 हून अधिक बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमध्ये सततच्या पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनाने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बागलुंग जिह्यात भूस्खलनामुळे एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत एक महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. पाल्पा जिह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पूर आणि भूस्खलनाने अनेक घरे आणि पूल वाहून गेले. अनेक ठिकाणी महामार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. बुटवलमधील पूरग्रस्त भागातून 1,000 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यापूर्वी, 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदीच्या पुरात 1,453 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 5,500 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

Advertisement

सततच्या पावसामुळे नेपाळमधील अनेक नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. रविवारी सकाळी 7:45 वाजता देवघाट येथील नारायणी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा दोन मीटर वर म्हणजेच एकंदर 11 मीटरवर वाहत होती. नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बुटवलमध्ये पुराच्या धोक्यामुळे सुमारे 200 कुटुंबांना त्यांच्या घरातून बाहेर काढत अन्यत्र स्थलांतरित केले. पुराचे पाणी अनेक भागात पोहोचल्यामुळे रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जलविद्युत प्रकल्प बंद, पिकांचे नुकसान

सततच्या पावसामुळे अनेक भागांतील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराचा परिणाम वीज निर्मितीवरही झाला आहे. 140-मेगावॅटचा कालीगंडकी, 25-मेगावॅटचा अप्पर माडी, 44-मेगावॅटचा सुपर माडी, 20-मेगावॅटचा नामार्जुन माडी आणि 40-मेगावॅटचा सेती नदी प्रकल्प यासह अनेक जलविद्युत प्रकल्पांमधील वीजनिर्मिती थांबवण्यात आली आहे. येथील नैसर्गिक आपत्तीदरम्यान 220-किलोव्होल्टच्या कालीगंडकी कॉरिडॉर पारेषण वाहिनीचे दोन टॉवर कोसळले आहेत. अनेक ठिकाणी वीज आणि वितरण वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.