नेपाळमध्ये महापुराच्या तडाख्यात शाळा गेली वाहून; मुख्याध्यापकांनी वाचवले 1,643 विद्यार्थ्यांचे प्राण
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत. नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली नदीच्या पुराचा तडाखा त्रिभुवन त्रिशूली माध्यमिक विद्यालयालाही बसला. मात्र, पुराचा धोका ओळखून शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी वेळीच विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविल्याने तब्बल १,६४३ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्रिशूली नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढू लागली. पुराचा धोका लक्षात येताच दवाडी यांनी शाळेतील शिक्षकांना तातडीने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्याचबरोबर शाळेकडे येणाऱ्या बसही परत वळविण्यात आल्या. त्यामुळे पुराचे पाणी शाळेच्या परिसरात पोहोचेपर्यंत एकही विद्यार्थी शाळेच्या इमारतीत राहिला नव्हता.
काही वेळातच आलेल्या महापुराने शाळेची इमारत आणि परिसर उद्ध्वस्त केला. मात्र, वेळेवर केलेल्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची मोठी जीवितहानी टळली. शाळेच्या वसतिगृहातील सुमारे 30 विद्यार्थिनींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. पुरानंतर मुख्याध्यापकांसह काही शिक्षक आणि विद्यार्थी डोंगराळ भागात अडकले होते. त्यातील सुमारे 40 विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना नंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
त्रिशूली नदीच्या पुरामुळे नुवाकोट आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडाला आहे. पूल, रस्ते, घरे आणि अन्य पायाभूत सुविधा वाहून गेल्या असून बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, वेळेवर मिळालेली पूराची माहिती आणि मुख्याध्यापक दवाडी यांची तत्परता यामुळे एका शाळेतील 1,643 विद्यार्थ्यांचे जीव वाचल्याचे हे उदाहरण ठरले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात योग्य वेळी घेतलेला निर्णय किती महत्त्वाचा ठरतो, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.