नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका; मृतांचा आकडा 469 वर, 977 जण बेपत्ता रसुवा जिल्ह्यात भीषण विध्वंस; अडथळा तलाव ओसंडल्याने बचावकार्याला ब्रेक
काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवरील प्रलयंकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर असून मृतांचा आकडा 469 वर पोहोचला आहे. तब्बल 977 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हिमनदी कोसळल्यानंतर भोटेकोशी नदीत आलेल्या पाणी, चिखल आणि दगडांच्या प्रचंड लोंढ्याने रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस केला.
रसुवा जिल्ह्यातील तिमुरे, स्याफ्रुबेसीसह अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे. घरे, पूल, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेले मृतदेह नेपाळमधील इतर जिल्ह्यांमध्येही सापडत असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अडथळा तलावामुळे नव्या पुराचा धोका
दरम्यान, पुरानंतर निर्माण झालेल्या माती आणि दगडांच्या नैसर्गिक अडथळ्यामुळे तयार झालेला तलाव ओसंडू लागला आहे. या तलावातील पाण्याचे प्रमाण वाढत असल्याने भोटेकोशी आणि त्रिशूली नदीकाठच्या भागांना पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती धोकादायक बनल्याने काही ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या बचावकार्याला तात्पुरता विराम देण्यात आला आहे.
हजारो जवानांकडून शोधमोहीम
बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळी लष्कर आणि पोलिसांचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि शोधपथकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. मात्र, खराब झालेले रस्ते, वाहून गेलेले पूल, नदीतील वाढलेली पाण्याची पातळी आणि नव्या पुराचा धोका यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या आपत्तीचा परिणाम परदेशी नागरिकांवरही झाला असून भारतासह अनेक देशांतील नागरिक बेपत्ता असल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता वाढली आहे.