ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान...
अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रांवर क्षेपणास्त्र अन् बॉम्ब हल्ला केला आहे. याचबरोबर इराण विरोधातील इस्रायलच्या युद्धात सामील होण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो आण्विक केंद्राला नष्ट करण्यासाठी ‘बंकर-बस्टर’ बॉम्बचा वापर केला. या बॉम्बला अत्याधुनिक स्टील्थ बी-2 बॉम्बवर्षक विमानाने पाडविण्यास सक्षम असणारा अमेरिका हा एकमात्र देश आहे. हा बॉम्ब पाडविण्यासाठी अमेरिकन बी-2 बॉम्बवर्षक कुठल्या मार्गाने इराणपर्यंत पोहोचले याचे उत्तर अमेरिकेनेच दिले.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पेट हेगसेथ आणि अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष आणि वायुदलाचे जनरल डॅन केन यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी अमेरिकन बी-2 बॉम्बवर्षक विमानांचा इराणपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविणारा नकाशा प्रदर्शित केला. बी-2 बॉम्बर अमेरिकेतून उड्डाण केल्यावर उत्तर अटलांटिक महासागर ओलांडून जिब्राल्टर सामुद्रधुनीमार्गे इराणच्या दिशेने पुढे गेले होते. यादरम्यान अमेरिकन विमानांनी बहुतांश काळ आंतरराष्ट्रीय हवाईक्षेत्रातूनच प्रवास केला. यानंतर स्पेन आणि उत्तर आफ्रिकेमधून जात भूमध्य समुद्रावर बी-2 विमानांनी उड्डाण केले. मग विमानांनी इस्रायली हवाई क्षेत्रातून प्रथम जॉर्डन आणि मग इराकला पार केले. यानंतर इराणच्या आण्विक केंद्रांवर बॉम्बवर्षाव करत ही विमाने परतली आहेत.
7 बी-2 स्पिरिट बॉम्बरद्वारे हल्ला
मुख्य स्ट्राइक पॅकेजमध्ये 7 बी-2 स्पिरिट बॉम्बवर्षक विमाने सामील होती. प्रत्येक विमानाचे उड्डाण 2 क्रू मेंबरकडुन केले जात होते. वैमानिकांनी इंटरसेप्टचा धोका टाळण्यासाठी कमीतकमी कम्युनिकेशनचा वापर केला. विमानांनी लक्ष्यक्षेत्रात 18 वेळा उड्डाण करत बॉम्बवर्षाव केला होता अशी माहिती जनरल केन यांनी दिली.