आंतरराष्ट्रीय चित्रपटात नेहा धूपिया
नेहा धूपिया स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरून नेहमी चर्चेत असते, परंतु सध्या नेहा ही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. इजिप्तचे दिग्दर्शक अली अल अरबी यांचा चित्रपट ‘ब्ल्यू 52’द्वारे नेहा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणार आहे. ‘ब्ल्यू 52’ची कहाणी भारतातील कोची आणि कतारमध्ये चित्रित करण्यात आली आहे. अली अल अरबी हे 2021 मध्ये प्रदर्शित माहितीपट ‘कॅप्टन ऑफ जातरी’मुळे ओळखले जातात.
ब्ल्यू 52 द्वारे स्वत:च्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे अत्यंत आव्हानात्मक तसेच प्रभावशाली व्यक्तिरेखा साकारण्याच संधी मिळाली आहे. हा परिवर्तनाचा अनुभव असुन तो लोकांवर स्थायी आणि मोठी छाप सोडणार असल्याचे नेहाने म्हटले आहे.
ब्ल्यू 52 ची निर्मिती प्रेमाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात इजिप्त, अमेरिका आणि भारताचे मिश्रण दाखविले जाईल. नेहाने या चित्रपटात स्वत:च्या भूमिकेसाठी अद्भूत समर्पण दाखविले असल्याचे अली अल अरबी यांनी म्हटले आहे.
कोचीचे सुंदर स्थान आणि कतारची सकारात्मक उर्जा या चित्रपटाची कहाणी व्यक्त करण्यासाठी उत्तम कॅनव्हास ठरला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट 9 वर्षीय मुलगा आशीषची कहाणी दर्शविणारा आहे. यात तो स्वत:च्या मोठ्या भावाला गमावल्यावर त्याचे वडिल त्याला कोचीतील एका बेटावर घेऊन जातात. चित्रपटात आशीष ही व्यक्तिरेखा मेस्सीचा चाहता असल्याचे दाखविण्यात आले आहे.