52 ब्ल्यू’मध्ये नेहा धूपिया
अभिनेत्रीचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट
अभिनेत्री नेहा धूपिया सध्या स्वत:चा आगामी चित्रपट 52 ब्ल्यू’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा लुक आणि ट्रेलर जारी केला आहे. नेहा यात एका वेगळ्या लुकमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट फीफा वर्ल्ड कप 2022 ची पार्श्वभूमीत एका भारतीय स्थलांतरित कामगाराच्या आयुष्यावर आधारित आहे.
नेहाने यात लियोनेस मेस्सीचा मोठा चाहता असलेल्या इसमाच्या (यादव शशीधर) आईची भूमिका साकारली आहे. हा इसम मेस्सीला भेटण्यासाठी विदेशात जातो, जेथे तो अडकून पडतो. भारतात आशीषचा परिवार प्रथम तो विदेशात जाणार असल्याने आनंदी होतो, परंतु तो जेव्हा परत येत नाही, तेव्हा परिवार त्रस्त होतो. मुलगा दूर झाल्याने त्याची आई चिंतातुर होत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटात नेहाच्या पतीची भूमिका आदिल हुसैन साकारत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण प्रामुख्याने कोची येथे पार पडले आहे. हा चित्रपट इजिप्तचे फिल्ममेकर अली अल-अरबी यांच्या दिग्दर्शनात तयार झाला आहे.
नेहा धूपियाने 2003 साली ‘कयामत’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर यापूर्वी ती अखेरची ‘बॅड न्यूज 2024’मध्ये दिसून आली होती. आता ती हॉलिवूडपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.