चौके बाजारपेठेतील खड्डे देतायत अपघाताला आमंत्रण
वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
चौके। प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चौके मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे धोकादायक बनले आहेत. गेले पाच -सहा महिने या खड्ड्यांबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत चौके यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांना लेखी तसेच तोंडी सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग हे धोकादायक खड्डे बुजवण्यास टाळाटाळ करत आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या खड्ड्यांमुळे काही दुचाकी चालकांचा किरकोळ अपघातही झाला आहे.व्यापारी बंधू, रिक्षा व्यवसायिक, वाळू व्यावसायिक यांच्याकडून अनेक वेळा दगड माती टाकून तसेच सिमेंट टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. मात्र ,पावसामुळे खड्डे पुन्हा पडतात. दुर्दैवाने या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनुचित घटना घडल्यास मालवण सर्वजनिक बांधकाम विभागास याला जबाबदार धरले जाईल. तसेच येत्या दोन दिवसात पॅच मारून हे धोकादायक खड्डे न बुजवल्यास ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायात चौके व आदर्श व्यापारी संघ यांच्याकडून देण्यात आला आहे.