फलक एक काम दुसरेच !
इन्सुली घाटातील प्रकार ; राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
मयुर चराटकर
बांदा
राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली घाटात महामार्ग विभागाच्या डोळेझाक पणामुळे साईडपट्टी खोदून केबल टाकण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे हे केबल टाकण्याचे काम करत असताना सावधान रस्त्याचे काम सुरु आहे असा धुळफेक करणारा फलक संबंधितांकडून महामार्गाच्या नजिक लावण्यात आला आहे. एका खाजगी कंपनीकडुन पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या ह्या घाटात कोणाच्या आशीर्वादाने हे असे खोटे फलक लावून काम केले जात आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. सदरच्या घाटात दरवेळी पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी महामार्गावर येते. अनेकदा घाटातील माती रस्त्यावर येऊन वाहतुकीस धोका निर्माण होतो. मात्र असे असताना संरक्षक कठड्याच्या सुरक्षेचा कोणताच विचार न करता संबंधित बिनधास्तपणे काम करत आहेत. खोटे फलक लावून वाहनधारक आणि स्थानिकांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडुन कारवाई करणे गरजेचे आहे. सदरचा घाट हा धोकादायक असताना रस्ता अजून धोकादायक बनण्यासाठी अशा कामाला पडद्याआडून मदत करणाऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.