अधिकारी, ठेकेदार, वास्तुविशारद यांच्याकडून कामात हलगर्जीपणा
कोल्हापूर / दीपक जाधव :
कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह आगीत बेचिराख झाल्यानंतर मुख्यमंत्री, महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय नेते यांनी पूर्वीच्या वैभवाला साजेशी पुनर्बांधणी करण्याची घोषणा केली.कित्येक महिन्यानंतरही एकूणच पुनर्बाधणी संथगतीने सुरू आहे. निधीच्या घोषणा केली पण चालू असलेले काम योग्य आहे की नाही हे बघायचे कोणी. कामाचा ठेकेदार व वास्तुविशारद मुंबईत आणि काम कोल्हापुरात होत असल्याने नाट्यागृहावरील छताच्या कैच्या या खाली बसवण्यात आल्या आहेत. काम आराखडयानुसार चालू आहे की नाही. हे सुध्दा पालिकेकडून बघितले जाते की अशी शंका आता रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना येऊ लागली आहे.
नाट्या क्षेत्रातील शहराचे वैभव मानले जाणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामाची मुदत संपल्यानंतरही छताचे काम पूर्ण झालेले नाही. 8 ऑगस्ट 2024 च्या रात्री लागलेल्या भीषण आगीत नाट्यागृहाच्या पाठीमागील भाग जळून खाक झाला. त्यानंतर नाट्यागृहाच्या पुर्नबांधणीसाठी शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामास नोव्हेंबर 24 पासून सुरुवात झाली. मात्र पाच-सहा महिन्यांनंतरही पहिल्या टप्प्यातील ग्राऊटिंगचे काम पूर्ण झाले असून छताचे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय पुढील टप्प्यातील कामे गतीने होऊ शकत नाहीत. त्यामुळेच संपूर्ण काम रखडले आहे.

त्यामुळे पुन्हा नाटकांची घंटा वाजण्यास किमान वर्ष लागण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा टप्प्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या छताच्या कामाला गती मिळायला हवी. अशी अपेक्षा कलाकार, नाट्यारसिक याच्या कडून होत आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले केशवराव भोसले नाट्यागृह पुन्हा आहे तसेच उभारण्यासाठी 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधीही मंजूर आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात 7 कोटी 35 लाख रुपयांची कामे सुरू आहेत. या पहिल्या टप्प्यात नाट्यागृहाच्या भिंती, छत आदींचे कामे होती त्यातील छताचे काम मुदत संपली तरी चालूच आहे. दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 22 लाख रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात गॅलरी, शेड आदी कामे आहेत. मात्र, अद्याप त्याची वर्कऑर्डर देण्यातही दिरंगाई झाली आहे. याबाबत सुचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात 11 कोटी 77 लाख रुपयांची अंतर्गत कामे केली जाणार आहेत. यात वातानुकूलीत यंत्रणा, अंतर्गत रचना, अग्निशमन, ध्वनी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही आदीची कामे करण्यात येणार आहेत.

- करण्यात येणारी कामे....
पहिला टप्पा : 7 कोटी 36 लाख होणारी काम - भिंत, छत उभारणी अपूर्ण.
दुसरा टप्पा : 3 कोटी 23 लाख होणारी काम - कला दालन कक्ष, ग्रीन रूम, खासबाग स्टेज, रूफिंग- निविदा मंजूर.सुरुवात नाही.
तिसरा टप्पा : 11 कोटी 77 लाख काम : इंटेरिअर, ध्वनी यंत्रणा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा आदी. प्रशासकीय मान्यता पूर्ण पण अद्याप सुरुवात नाही.
- उर्वरित काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल...
केशवराव भोसले नाटयगृहाच्या कामात दोन महिन्याचा उशीर झाला असून उर्वरित काम डिसेंबर अखेर पुर्ण होईल. याबाबत संबंधित ठेकेदार व वास्तुविशारद यांच्याकडून सोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार आहे.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.