For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डोळ्यासमोर असूनही दुर्लक्षित इतिहासाची साक्ष..

02:57 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
डोळ्यासमोर  असूनही दुर्लक्षित इतिहासाची साक्ष
"Neglect of Main Rajaram High School's Architecture"
Advertisement

मेन राजाराम हायस्कूलची वास्तूची अवस्था
राजाराम महाराज (दुसरे) यांचेही पिढीला विस्मरण

Advertisement

कोल्हापूरः सुधाकर काशीद

‘डोळ्यांसमोर आहे, पण नजरेस येत नाही,’ असे दुर्लक्षित जीवन काही स्थानांच्या काही वास्तूंच्या आणि काही व्यक्तीच्या वाट्याला येते. त्यामुळे त्या स्थानाचे महत्त्व एका मर्यादेतच राहते. जुनी पिढी संपली, की होती ती ओळखही धुसर-धुसर होते. नेमकी हीच परिस्थिती कोल्हापूर संस्थांनचे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) व त्यांच्या नावाने असलेल्या मेन राजाराम हायस्कूल या कोल्हापुरातल्या सर्वोत्कृष्ट वास्तूच्या वाट्याला आलेली आहे. अंबाबाई दर्शनाच्या निमित्ताने रोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस मंदिराजवळ असलेले मेन राजाराम हायस्कूल हे ऐतिहासिक ज्ञान मंदिर येत नाही. किंवा ते कोणी दाखवून देत नाही, अशी नको ती अवस्था सध्या आहे. हे कोण राजाराम महाराज? असेही नवी पिढी आणखी काही वर्षांनी विचारेल, असे दुर्लक्ष त्याकडे आपल्या कोल्हापूरकरांचेच झाले आहे.
या परिस्थितीत ज्यांच्या नावाने हे मेन राजाराम हायस्कूल आहे, ते राजाराम महाराज कोण? याचीच पहिल्यांदा या पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. हे राजाराम महाराज म्हणजे मूळ नागोजीराव पाटणकर. कोल्हापूर संस्थानात छत्रपती बाबासाहेब महाराजांनी त्यांना 18 ऑगस्ट 1866 रोजी दत्तक घेतले व त्यांचे नामकरण राजाराम महाराज झाले. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत बाबासाहेब महाराज यांचे निधन झाले व राजाराम महाराजांनी भविष्याचा वेध घेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आधुनिक पाश्चात्य शिक्षणावर त्यांनी भर दिला.

Advertisement

जमशेदजी उनावाला व इंग्रजी अधिकारी वेस्ट हे त्यांचे ट्युटर होते. इतिहास, भूगोल हे विषय व पर्यटनात त्यांना विशेष रस होता. राज्याची न्याय व्यवस्था व महसूल विभागावरही त्यांचे लक्ष होते. कोल्हापूर संस्थानात उच्च शिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी जुन्या राजवाड्याच्या नगारखान्याला लागून असलेल्या जागेत नव्या हायस्कूलची पायाभरणी केली. या हायस्कूलच्या वास्तूची रचना मेजर माँट या विख्यात वास्तूविशारदाने केली. त्यानेच नवीन राजवाडा व टाऊन हॉलचा आराखडा तयार केला. हे हायस्कूल आता मेन राजाराम हायस्कूल म्हणून ओळखले जाते. तेथेच पूर्वी राजाराम कॉलेज होते.

कोल्हापूरच्या शिक्षण प्रवाहात या वास्तूचा वाटा खूप म्हणजे खूप मोठा राहिला. दुमजली पूर्ण दगडी अशा या वास्तूत राजप्रासादाला शोभतील अशा खोल्या, व्हरांडा, मेन हॉल, घुमटाकार सज्जे, कारंजे, वक्राकार जिने, तिसऱ्या मजल्यावर खास चित्रकला शिक्षणासाठी ड्रॉईंग हॉल व मागील बाजूस ओपन एअर थिएटर बांधले. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही राजप्रासादात बसून शिक्षणाचे धडे घ्यावेत, एवढा उदात्त हेतू राजाराम महाराजांचा होता आणि तो सफलही झाला. या मेन राजाराम हायस्कूलमधील कारंजा कायम फवारत राहावा म्हणून कळंबा येथून आणलेल्या पाण्याच्या नळाची खास जोड या कारंजाला दिली गेली. आजही हे हायस्कूल आहे. अगदी भवानी मंडपाला खेटून आहे. पण त्याकडे कोणाची नजरच नाही, असे आजूबाजूचे वातावरण आहे. त्यामुळे या वास्तूसमोरून रोज हजारो पर्यटक येतात., पण क्वचितच कोणीतरी या वास्तूकडे मान वळवून बघतात. आता हायस्कूलमधील विद्यार्थी पटसंख्या फक्त शंभरच्या आसपास आहे. शाळा बंद करून दुसरे ‘काहीतरी’ करण्याचा घाट मध्यंतरी घातलाच गेला आहे. आता गावात पार्किंगचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे सारे पार्किंग या वास्तूच्या विस्तीर्ण परिसरात करावे, अशी टुम कोणीतरी काढली आहे. पण कोल्हापुरातले हे पहिले देखणे शिक्षण मंदिर आहे. ते राजाराम महाराजांनी सुरू केले आहे, हे कोल्हापूरकरच विसरले गेले आहेत.

हे राजाराम महाराज युरोप दौऱ्यावर असताना त्यांचे इटलीत 30 नोव्हेंबर 1870 रोजी फ्लॉरेन्समध्ये निधन झाले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या जागी कोल्हापूर संस्थानकडून समाधी (छत्री) बांधण्यात आली. फ्लॉरेन्स प्रशासन त्यांची देखभाल करते. हा झाला राजाराम महाराजांच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा व मेन राजाराम हायस्कूल या वास्तूचा इतिहास. पण आता परिस्थिती वेगळी आहे. या वास्तूचा ताबा कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे आहे. सारा इतिहास नव्या पिढीच्या कोल्हापूरकरांना पुन्हा सांगण्याची गरज आहे. नंदिनी प्रवीणसिंह घाटगे यांनी हा इतिहास मांडला आहे. पण तो मराठीतून नव्या पिढीसमोर आला तरच राजाराम महाराजांच्या इतिहासाचे चीज होणार आहे आणि ते नव्या पिढीपर्यंत थोड्याफार प्रमाणात का होईना जाऊन पोहोचणार आहे. नाही तर राजाराम महाराज कोण? असे नव्या पिढीने विचारले तर त्यात आश्चर्य नसणार आहे.

Advertisement
Tags :

.