इराण-अमेरिका तणावाने शेअर बाजारात नकारात्मक मूड
सेन्सेक्स 171 अंकांनी घसरणीत, ब्रेंट व्रुडचे दर वाढले, आयटी समभाग तेजीत
वृत्तसंस्था, मुंबई
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, ब्रेंट व्रुडचे वाढते भाव या साऱ्याचा परिणाम सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारावर नकारात्मक दिसून आला. सेन्सेक्स दिवसअखेर 171 अंकांनी घसरला होता तर निफ्टी 32 अंकांनी कमकुवत होत बंद झाला. आयटी निर्देशांक मात्र काहीशी तेजी दाखवत बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 171 अंकांनी घसरत 77369 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 32 अंकांनी नुकसानीसह 24219 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी बँक निर्देशांक 236 अंकांनी घसरत 57525 च्या स्तरावर बंद झाला. इराण व अमेरिकेतला संघर्ष संपायचे नाव घेत नाही आहे, कच्च्या तेलाच्या किमतीत वृद्धी तसेच महागाई पुन्हा वाढण्याच्या शक्यतेने बाजारावर नकारात्मक परिणाम केला. गुंतवणूकदार यावेळी सावध झालेले दिसले. अमेरिकेतील बाजारातही नरमाई होती, त्याचे पडसाद बाजारावर होते. मागच्या आठवड्यात अमेरिकेतील बाजार कमकुवत होता. बँकिंग व फायनॅन्शीयल समभागावर सोमवारी दबाव पाहायला मिळाला. बँक ऑफ बडोदा व कॅनरा बँक या बँका सर्वाधिक घसरणीत राहिल्या. फायनॅन्शीयल समभागांमध्ये एसबीआय लाइफ, बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व्ह यांची कामगिरी खराब झाली होती.
लार्जकॅप समभागांत दबाव होता, पण मिडकॅपमधील कंपन्यांनी बाजाराला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 82 अंकांनी वाढत 63,817 अंकांवर बंद झाला. यातील सिमेन्स, सेल व ग्लेनमार्क फार्मा हे तेजीसह बंद झाले होते.
विविध निर्देशांकांची कामगिरी
क्षेत्रांची कामगिरी पाहता ऑटो, सीपीएसई, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, फार्मा यांचे निर्देशांक दबावासह बंद झाले. तर दुसरीकडे कमोडिटीज, एनर्जी, एफएमसीजी, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, रियल्टी यांचे निर्देशांक मजबूतीसोबत बंद झाले.
समभागांची कामगिरी निफ्टीत पाहता पोलाद क्षेत्रातील जेएसडब्ल्यू स्टील 2.57 टक्के, हिंडाल्को 2.37 टक्के, टाटा स्टील 1.80 टक्के, आयटी कंपनी एचसीएल टेक 1.50 टक्के, डॉ. रे•िज लॅब्ज 1.30 टक्के तर टाटा कंझ्युमरचा समभाग 1.29 टक्के वाढत बंद झाला होता.