इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये नकारात्मक वातावरण
फेब्रुवारीत घटली कार विक्री : चार्जिंग केंद्रांची कमतरता ठरले कारण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
देशात सध्याला ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार करता इलेक्ट्रिक गटातील आपलं योगदान अधिक मजबूत करण्याकडे अनेक कंपन्यांचा कल दिसतो आहे. नव्या डिझाईनसह कल्पक योजनांच्या माध्यमातून कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात उतरवण्याच्या दिशेने कार्यरत आहेत. मात्र दुसरीकडे सध्याला देशामध्ये चार्जिंग केंद्रांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत म्हणावा तितका उत्साह मात्र जाणवत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपन्याही सध्याला चिंता व्यक्त करायला लागल्या आहेत.
मागच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत 7231 इलेक्ट्रिक कारची विक्री झाली आहे. यातुलनेत जानेवारीमध्ये पाहता 8164 कार्सची विक्री झाली होती. जानेवारी 2024 च्या तुलनेमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये 11.43 टक्के घसरण दिसून आली आहे. परंतु फेब्रुवारी 2023 च्या तुलनेमध्ये विक्री 51 टक्के वर्षाच्या आधारावर पाहता वाढीव दिसून आली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये 4766 कार्सची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन म्हणजेच फाडा या संघटनेने ही माहिती दिली आहे.