महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट’ प्रकरणात तेजस्वी यादवांकडे बोट

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा आरोप, वादाला राजकीय वळण, चौकशीची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

Advertisement

सध्या गाजत असलेल्या ‘नीट-युजी’ प्रवेश परीक्षा घोटाळ्याचा संबंध राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी आहे, असा गंभीर आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केला आहे. गुरुवारी बिहारची राजधानी पाटणा येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. त्याच्या पुष्ट्यार्थ त्यांनी दूरध्वनी संवादांचीही माहिती दिली. आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याचे आरोप-प्रत्यारोपांवरुन दिसून येत आहे.

या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना तसेच काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना मिळाली त्यांच्यापैकी काहींची चौकशी केली जात आहे. सिंकदर कुमार यादवेंदू हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे. यादवेंदू हा तेजस्वी यादव यांचे व्यक्तिगत सचिव प्रीतम कुमार यांचा जवळचा नातेवाईक आहे. यादवेंदू आणि या प्रकरणात सहभाग असलेले इतर विद्यार्थी यांच्यासाठी पाटण्याच्या सरकारी अतिथीगृहात खोल्या मिळवून देण्यासाठी प्रीतम कुमार यांनी दूरध्वनीवरुन अतिथीगृहाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा आरोप विजय सिन्हा यांनी पत्रकारपरिषदेत केला.

फोनकॉल्सची माहिती

विजय सिन्हा यांच्या आरोपानुसार प्रीतम कुमार यांनी 1 मे 2024 या दिवशी अतिथीगृहाचा कर्मचारी प्रदीप कुमार याला दूरध्वनी करुन खोल्या राखीव ठेवण्याची सूचना केली होती. 4 मे या दिवशी पुन्हा एकदा त्यांनी याच कामासाठी या कर्मचाऱ्याला दूरध्वनी केला होता. या संवादात त्यांनी तेजस्वी यादव यांचा उल्लेख ‘मंत्रीजी’ असा केला होता. या संबंधीची माहिती, एक दूरध्वनी क्रमांक आणि मंत्रीजी शब्द अतिथीगृहाच्या नोंदवहीत आहे, असाही सिन्हा यांचा आरोप आहे.

चौकशीचा आदेश

सिन्हा हे बिहारचे मार्गनिर्माण मंत्रीही आहेत. त्यांनी अतिथी गृहात खोल्या राखण्यासंबंधीच्या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. मी माझ्या विभागातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करीत आहे. कोणते कर्मचारी तेजस्वी यादव यांच्या इशाऱ्यावरुन काम करीत आहेत, हे शोधून काढले जाईल. अतिथीगृहात यादवेंदू यांची बहीण रीना यादव आणि भाऊ अनुराग यादव यांच्यासाठीही खोल्या नोंदल्या गेल्या होत्या. या सर्व घटनांची सखोल चौकशी केली जाईल. तेजस्वी यादव यांना साहाय्य करणारे कर्मचारी अनेक विभागांमध्ये काम करतात. त्यांना शोधले जाईल. राष्ट्रीय जनता दलाची व्यवस्थाच गुन्हे आणि भ्रष्टाचाराने बरबटली आहे, असे अनेक गंभीर आरोप उपमुख्यमंत्री सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत केले.

राजदकडून इन्कार

राष्ट्रीय जनता दलाने सिन्हा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात तेजस्वी यादव यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न बिहारमध्ये सध्या सत्ताधारी असलेल्या संयुक्त जनता दलाच्या सरकारकडून केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचाही या कारस्थानात सहभाग आहे, असा प्रत्यारोप तेजस्वी यादव यांच्यावतीने राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला.

प्रश्नपत्रिका 4 मे ला फुटली

नीट-युजी प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी, अर्थात, 4 मे या दिवशी फुटली होती, असा पुरावा बिहारच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने शोधला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा सूत्रधार मानल्या गेलेल्या सिकंदर कुमार यादवेंदू याला अटक करण्यात आली. 5 मे या दिवशी रीना यादव हिला अतिथीगृहातून ताब्यात घेण्यात आले. अतिथीगृहात प्रवेश परीक्षेचा ओएमआर शीटही सापडला आहे. अतिथीगृहाची नोंदवही जप्त करण्यात आली आहे. या वहीतील नोंदी आणि दूरध्वनी क्रमांक यांची तपासणी केली जात आहे.

सिकंदरवर पूर्वीही अनेक प्रकरणे

नीट प्रकरणातील संशयित सूत्रधार सिकंदर यादवेंदू याच्यावर 2012 मध्ये 3 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अभियोग चालला होता. त्यात त्याला कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो बाहेर पडला आहे. पूर्वी तो कंत्राटदार म्हणून रांची येथे काम करीत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.

शिक्षण संस्था भाजपकडून ताब्यात !

नीट प्रकरणात आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही उडी घेतली आहे. देशातील अनेक शिक्षणसंस्थांचा ताबा आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे. जोपर्यंत या लोकांना तेथून बाहेर काढले जात नाही, तो पर्यंत प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडतच राहतील, असा आरोप त्यांनी केला आहे. न्यायालय नियंत्रित चौकशीच्या मागणीला त्यांनी समर्थन दिले आहे.

नीट प्रकरणाला वेगळी कलाटणी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article