For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नीट’ पेपर फुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांवर परिणाम नाही

11:32 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नीट’ पेपर फुटीचा गोव्यातील विद्यार्थ्यांवर परिणाम नाही
Advertisement

लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Advertisement

पणजी : गोव्यातील उच्च शिक्षित अधिकाधिक विद्यार्थी हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) राज्य कोट्यातून प्रवेश घेतात. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याचा  येथील विद्यार्थ्यांवेर फारसा परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी आमदार कार्लुस फेरेरा यांनी यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्र्यानी, गोमेकॉत राज्य कोट्यातून केवळ गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी सदर विद्यार्थ्यी गोव्यातूनच 12 वी विज्ञान उत्तीर्ण असणे तसेच ठराविक काळासाठी त्याचे वास्तव्य गोव्यात असणे आवश्यक आहे.

त्यामुळे नीटच्या जाहीर करण्यात आलेल्या नव्या निकालामुळे येथील विद्यार्थ्यांचे करिअर किंवा प्रवेशप्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील केवळ दोन ते तीनच विद्यार्थी दिल्लीतील ‘एम्स’ सारख्या मोठ्या संस्थेत प्रवेश घेतात. अशावेळी अशा विद्यार्थ्यांवर पेपर फुटीचा किंचित परिणाम होऊ शकतो. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित आल्यामुळे राज्य सरकार याविषयी काहीच करू शकत नाही. केंद्र सरकार, एनटीए हे सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे काम करतात. केंद्र सरकारने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सरकारचे उच्च शिक्षण संचालनालय एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, नर्सिंग यासारख्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ करेल. त्यामुळे विद्यार्थी किंवा पालकांनी चिंता करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

यावेळी बोलताना आमदार विजय सरदेसाई यांनी, हा विषय राज्याच्या अखत्यारित नसला तरी केंद्रांतील भाजप सरकार पेपर फुटी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. आमदार क्रुझ सिल्वा यांनीही केंद्रीय परीक्षा न घेता राज्यस्तरीय परीक्षा घेण्याबद्दल विचार करपाची सूचना केली. आमदार चंद्रकांत शेट्यो, नीलेश काब्राल यांनी बोलताना विरोधी आमदारांनी या विषयावरून अकारण गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला दिला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, नीट तसेच बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यातील 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्यातर्फे विशेष कोचिंग देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.