शहरात पोलीस बंदोबस्तात पार पडली ‘नीट’ परीक्षा
प्रशासनासह विद्यार्थी-पालकांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास
बेळगाव : देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणारी ‘नीट’ परीक्षा रविवारी बेळगाव शहरासह परिसरातील विविध केंद्रांवर अत्यंत कडक बंदोबस्तात सुरळीतपणे पार पडली. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता ही परीक्षा झाली. यामुळे प्रशासनासह विद्यार्थी व पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. बेळगाव शहरातील 28 केंद्रांवर 7 हजार 218 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मागील महिन्यात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 8 ते 10 पोलीस तैनात करण्यात आले होते. प्रत्येक परीक्षार्थीची कसून चौकशी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडले जात होते.
संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी बेळगाव शहरात आल्याने मोठी गर्दी झाली होती. बसस्थानक, रेल्वेस्थानक यासह रिक्षास्टँडवरही विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून आली. एनटीएकडून नीट परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली होती. त्यानुसार ड्रेसकोड तसेच इतर सर्व बाबींची तपासणी करूनच परीक्षार्थींना प्रवेश दिला जात होता. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर होती. विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासून आत सोडले जात होते. ज्या विद्यार्थ्यांनी ड्रेसकोड संहिता पाळली नाही त्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले होते. मोबाईल, ब्ल्यू टूथ, स्मार्टवॉच यासह इतर कोणत्याही वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली होती. पेन देखील परीक्षा केंद्रातच पुरविण्यात आले.
शहरात सर्वत्र पोलिसांकडून नजर
प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून परीक्षा केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद करण्यात आली होती. त्याबरोबरच काही भागातील पानपट्ट्या पोलिसांनी रविवारी सकाळपासून बंद करण्याची सूचना केली होती. तसेच परीक्षा केंद्रांबाहेर कोणीही फिरकू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरू होती. परीक्षा संपेपर्यंत शहरात सर्वत्र पोलिसांकडून नजर ठेवली जात होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
नीट परीक्षेवर जिल्हा प्रशासनाकडून नजर ठेवण्यात आली होती. रविवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेत आढावा घेतला. कुठेही हलगर्जीपणा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.