For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव शहरात ‘नीट’ परीक्षा सुरळीत

12:47 PM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव शहरात ‘नीट’ परीक्षा सुरळीत
Advertisement

 सकाळपासूनच विद्यार्थी, पालकांची धावपळ : परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

Advertisement

बेळगाव : मेडिकलसह इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया असलेली ‘नीट युजी’ परीक्षा रविवारी बेळगावमध्ये सुरळीत पद्धतीने पार पडली. महत्त्वाची परीक्षा असल्याने शहरात सकाळपासूनच विद्यार्थी, पालक यांची धावपळ सुरू होती. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाभरातून विद्यार्थी शहरात आल्याने मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन या परिसरात गर्दी झाली होती.

एमबीबीएस, बीडीएस यासह इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशभरात एकाच वेळी नीट परीक्षा घेण्यात आली. बेळगाव शहरात एकूण 24 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यासाठी 7 हजार 218 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परंतु, परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली असल्याने सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.

Advertisement

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील परीक्षा केंद्रांबाबत तितकीशी माहिती नसल्याने ते शोधण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. त्यामुळे रिक्षांसाठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी बस व रेल्वेने शहरात दाखल झाल्याने तेथेही सकाळी व सायंकाळच्या सत्रात गर्दी झाल्याचे दिसून आले. व्हीटीयू विद्यापीठापासून ते भुतरामहट्टीच्या आरसीयू विद्यापीठापर्यंत एकूण 24 केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडली.

कडक तपासणी...

नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) कडून परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक व धातूच्या वस्तू, डिजिटल घड्याळ यांना बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर ड्रेसकोड निश्चित करण्यात आला होता. तरीदेखील काही विद्यार्थी घड्याळ, बेल्ट व मनाई असलेले ड्रेस घालून आल्याने त्या विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. काही विद्यार्थी नव्याने कपडे खरेदी करून परीक्षा केंद्रांवर पोहोचल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.