For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅप शूटिंगमध्ये नीरु धांडाचा सुवर्णवेध, अॅथलेटिक्समध्येही गोल्ड

06:55 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रॅप शूटिंगमध्ये नीरु धांडाचा सुवर्णवेध  अॅथलेटिक्समध्येही गोल्ड
Advertisement

एशियन गेम्समध्ये एकाच दिवसात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य : महिलांच्या 4 बाय 400 मी रिलेत गोल्ड 

Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज नीरू धांडाने ‘सुवर्ण वेध‘ घेत महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारातील पहिले सुवर्णपदक ठरले. याशिवाय, भारतीय संघाने महिलांच्या 4 बाय 400 मीटर शर्यतीत 3 मिनिटे 29.69 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच, महिलांच्या सांघिक ट्रॅप प्रकारात भारताचे रुपेरी यश मिळवले. महिलांच्या उंच उडीत पूजा सिंगने कांस्य तर पुरुषांच्या 5000 मी शर्यतीत गुलवीर सिंगने कांस्यपदक जिंकून यंदाच्या स्पर्धेतील पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तर भारताने 4 बाय 100 मी. मिश्र रिले शर्यतीत कांस्य जिंकले. दरम्यान, पदकतालिकेत भारत 6 सुवर्णासह एकूण 52 पदकांची कमाई करत 10 व्या स्थानी आहे.

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात नीरु धांडा ही महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. फायनलमध्ये 26 वर्षीय नीरूने 30 पैकी 28 नेम अचूक लावत पहिले स्थान पटकावले. जपान आणि चीनच्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत तिने भारताच्या खात्यात चालू स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीतही तिने 118 गुणांसह अव्वल स्थान मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या विक्रमाची बरोबरी केली होती. चीनची सन युनॉगने 26 गुणांसह रौप्य पदक तर कुवेतच्या हाजर अब्दुलमलिकने 21 गुणांसह कांस्य पदक जिंकले. विशेष म्हणजे, निर्णायक टप्प्यात नीरूने दबावाखालीही शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

जबरदस्त कामगिरी अन यशाला गवसणी

दरम्यान, स्पर्धेला येण्यापूर्वी युवा नेमबाज नीरूला 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला तीव्र फ्लू झाला होता. ती पाच दिवस काहीही खाऊ किंवा पिऊ शकली नाही. पण तिचे प्रशिक्षक मनशेर सिंग यांनी तिला आजारपण विसरून आपले सर्वस्व पणाला लावण्यासाठी प्रेरित केले.

महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारातही रुपेरी यश

नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाने एकूण 328 गुण मिळवले. चीनने 346 गुणांसह सुवर्णपदक, तर कुवेतने 325 गुणांसह कांस्यपदक जिंकले. दरम्यान, नेमबाजीतील हे भारताचे 14 वे पदक ठरले आहे.

उंच उडीत पूजाला कांस्य

भारताच्या 19 वर्षांच्या पुजाने उंच उडीत कांस्य पदक जिंकले आहे. तिने पाचव्या प्रयत्नात 1.84 मीटर उंच उडी मारत हे पदक जिंकले. या स्पर्धेत उझबेकिस्तानच्या सैफुल्लायेवाने 1.90 मीटर उंच उडी मारत सुवर्णपदक मिळवले, तर कझाकस्तानच्या क्रिस्टिना ओव्हचिनिकोवाने 1.87 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक जिंकले.

गुलवीर सिंगची हॅट्ट्रिक

भारताचा धावपटू गुलवीर सिंगने पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्य पदकाची कमाई केली. त्याने 13:32.75 सेकंद वेळ नोंदवली. बहरीनच्या बिरहानू बालेवने 13:30.79 वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या तोमोनोरी यामागुचीने 13:31.43 वेळेसह रौप्यपदक पटकावले. दरम्यान गुलवीरने यापूर्वी पुरुषांच्या 10,000 मीटर आणि 1500 मीटर शर्यतींमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. यामुळे तो एकाच आशियाई स्पर्धेत तीन वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुलवीरच्या या यशाचे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी अभिनंदन केले आहे.

बॉक्सिंगमध्ये नरेंदरला कांस्य

भारताच्य नरेंदरला पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या आयबेककडून पराभवाचा धक्का बसला.

रिलेमध्ये सुवर्ण आणि दोन कांस्य

मंगळवारचा दिवस भारताच्या रिले संघांसाठीही खास ठरला. महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. विथ्या रामराजने हे सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. तिला किरण पहल, एम. आर. पूवम्मा, प्राची यांची भक्कम साथ मिळाली. या चौघींनी 3:29.69 वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. बहरीनने 3:30.21 अशी वेळ नोंदवताना रौप्यपदक जिंकले, तर चीनने 3:31.02 वेळेसह कांस्यपदक पटकावले. विशेष म्हणजे, अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

सहाव्या लेनवरुन किरणने भारताला चांगली सुरुवात करून दिली आणि नंतर बॅटन पूवम्माकडे सोपवले. अनुभवी पूवम्माने दुसऱ्या लेनमध्ये शानदार वेग पकडत भारताला आघाडीवर आणले. त्यानंतर प्राचीने तिसऱ्या लेनमध्ये भारताची आघाडी कायम ठेवली. यानंतर भारताला सुवर्णपदकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विथ्या रामराजवर होती. बॅटन हातात येताच तिने वेग वाढवत आघाडी घेतली. अखेरच्या टप्प्यात बहरीनच्या सलवा ईद नासरने जोरदार आव्हान उभे केले, पण विथ्याला गाठण्यात तिला यश आले नाही. विथ्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णयशाला गवसणी घातली.

पुरुषांच्या रिलेमध्येही भारताला कांस्य

भारताने पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये 3 मिनिटे 01.61 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. जपान आणि कतारने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले. भारताकडून धर्मवीर चौधरी, मनू टी., जय कुमार आणि विशाल टीके या भारतीय चौकडीने चांगली कामगिरी केली. जपानने 3 मिनिटे 00.75 सेकंदांसह सुवर्ण, तर कतारने 3 मिनिटे 00.93 सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील गतविजेत्या भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या रिलेनंतर पुरुषांच्या रिलेतही सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले.

मिश्र रिलेत कांस्यपदकाची कमाई

दरम्यान, 4 बाय 100 मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताला कांस्य पदक मिळाले. या भारतीय संघात गुरिंदरवीर सिंग, स्नेहा सत्यनारायण, अनिमेश कुजूर, हरिता भद्रा या धावपटूंचा समावेश होता. त्यांनी 41.06 सेकंदाचा वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले. चीनने 40.78 वेळेसह सुवर्ण, तर थायलंडने 49.87 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले.

Advertisement
Tags :

.