डायमंड लीग फायनल्समध्ये नीरजने पटकाविले स्थान
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2026 च्या अॅथलेटिक्स हंगामातील डायमंड लीग स्पर्धेचा अंतिम टप्पा (फायनल्स) 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स येथे होणार आहे. भारताचा भालाफेकधारक नीरज चोप्राने या फायनल्ससाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
या प्रतिष्ठेच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत दुखापतीमुळे नीरज चोप्राला केवळ दोन टप्प्यातील स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविता आला. त्याने या दोन स्पर्धांमध्ये 12 गुण मिळविले. डोहा येथे 19 जून रोजी तर लॉसेन येथे 21 ऑगस्ट रोजी झालेल्या डायमंड लीग टप्प्यात नीरजने दुसरे स्थान मिळविले होते. या कामगिरीमुळे नीरज चोप्राला गुणतक्त्यामध्ये सहावे स्थान मिळविले. झुरीचमध्ये डायमंड लीगमधील 14 वा आणि शेवटचा टप्पा गुरुवारी झाला आणि त्यानंतर भालाफेक प्रकारामध्ये अंतिम गुणतक्ता ठरविण्यात आला.
28 वर्षीय नीरज चोप्राला मध्यंतरी पाठदुखापतीची समस्या चांगलीच जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून त्याला या समस्येमुळे चांगलेच भेडसावले आहे. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग दर्शवून 85.83 मी. ची नोंद करत रौप्यपदक पटकाविले. तसेच त्याने अलिकडेच झालेल्या डायमंड लीग लॉसेन टप्प्यामध्ये त्याने या क्रीडा प्रकारात 88.05 मी. ही सर्वोत्तम कामगिरी केली.
ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या डायमंड लीग अंतिम टप्प्यासाठी (फायनल्स) अॅथलेटिक्स प्रकारातील उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक या प्रकारातील गुणतक्त्यातील आघाडीचे 6 अॅथलिट्स सहभागी होत आहेत. ब्रुसेल्समधील ही स्पर्धा 4 सप्टेंबरपासून सुरु होणार असून या टप्प्यात एकूण 16 क्रीडा प्रकार घेतले जातील. भालाफेक हा क्रीडा प्रकार 5 सप्टेंबरला होईल. पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील विजेत्याला चषक आणि किमान 30 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येईल. तर या प्रकारात आठवे स्थान मिळविणाऱ्या खेळाडूला एक हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल.
भालाफेक या क्रीडा प्रकारात सध्याच्या मानांकनात लंकेचा भालाफेकधारक रुमेश पथिरागे हा पहिल्या स्थानावर असून त्याने सर्वाधिक म्हणजे 39 गुण मिळविले आहेत. तो ब्रुसेल्सच्या अंतिम टप्प्यात चषकाच्या मानकरीसाठी फेव्हराईट म्हणून ओळखला जातो. त्याने या वर्षीच्या डायमंड लीग स्पर्धेच्या हंगामात आतापर्यंत पाचही टप्प्यात आपला सहभाग दर्शविला असून त्याने चार टप्प्यात सुवर्णपदक तर एका टप्प्यात रौप्यपदक मिळविले आहे. झुरीचमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने 92.07 मी. ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या मानांकन यादीत ग्रेनेडाचा अँडर्सन पीटर्स 35 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्याने झुरीच स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. तर पथिरागेने पहिले स्थान घेतले होते. पथिराने आणि पीटर्स हे दोन्ही अॅथलिटस डायमंड लीग अंतिम टप्प्यासाठी यापूर्वीच पात्र ठरले आहेत. बुडापेस्टमध्ये 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पहिल्या विश्व अॅथलेटिक्स अल्टीमेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नीरज चोप्रा पात्रतेसाठी प्रयत्नशील राहिल. 5 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या डायमंड लीग फायनल्समधील विजेत्याला अल्टिमेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाईल. बुडापेस्टमध्ये होणाऱ्या पहिल्या विश्व अॅथलेटिक्स अल्टीमेट स्पर्धेसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 1 कोटी डॉलर्सची ठेवण्यात आली असून सुवर्णपदक विजेत्याला प्रत्येकी 150,000 डॉलर्सची रक्कम मिळेल.