निरज चोप्राचे लक्ष्य डोहा स्पर्धेवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकधारक निरज चोप्रा आता 2025 च्या अॅथलेटिक हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. डोहा येथे होणाऱ्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेवर निरजचे आता लक्ष्य राहिल.
2024 च्या अॅथलेटिक हंगामात निरज चोप्राला वारंवार दुखापतीच्या समस्येने चांगलेच दमविले होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळविले होते. डायमंड लीग सिरीजमधील 2023 च्या डोहातील झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत निरज चोप्राने 88.67 मी.चा भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते. तर 2024 च्या डोहातील स्पर्धेत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्याने 88.36 मी.चा भालाफेक केला होता तर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारा झेक प्रजासत्ताकचा जेकुब व्हॅडेलेजने 2024 च्या डोहातील स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. डायमंड लीग सिरीजमधील अंतिम स्पर्धेत निरज चोप्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2024 च्या अॅथलेटिक्स हंगामाध्ये झालेल्या विविध सहा स्पर्धांमध्ये निरज चोप्राने दोन स्पर्धेत विजेतेपद तर चार स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळविले होते. डोहातील स्पर्धा झाल्यानंतर 24 मे रोजी हरियाणामध्ये होणाऱ्या एकदिवशीय विश्व अॅथलेटिक्स अ दर्जाच्या अॅथलेटिक स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे.