नीरज चोप्रा लुसाने डायमंड लीगमध्ये उतरणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत आपण सहभागी हेणार असल्याचे निश्चित केले. प्रदीर्घ काळ दुखापतीचा सामना केलेल्या चोप्राने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. तीन वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले होते.
‘मी शेवटी लॉसने डायमंड लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे’, असे चोप्राने आभासी संवादादरम्यान सांगितले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या ऑलिम्पिक फायनलनंतर काही दिवस व्यस्त राहिलेल्या चोप्राने स्वित्झर्लंडमध्ये प्रशिक्षण व सराव सुरू केला आणि दुखापतीमुळे मर्यादा पडलेल्या असूनही उच्च स्तरावर हंगाम समाप्त करण्याचा निर्धार त्याने केला आहे.
ब्रुसेल्समध्ये 13 व 14 सप्टेंबर रोजी होणार असलेल्या डायमंड लीगने मोसमाची समाप्ती होणार असून त्यानंतर चोप्रा त्याच्या मांडीच्या दुखापतीवर डॉक्टरांचा सल्ला घेईल. त्याला शस्त्रक्रिया करावी लागण्याची दाट शक्यता आहे. ‘मोसम संपल्यानंतर अंतिम उपचार होईल. फक्त एक महिना बाकी आहे. मी शक्य तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर डॉक्टरांचा सल्ला घेईन. मी फक्त झुरिच डायमंड लीग आणि फायनलचा विचार करत होतो. पण सुदैवाने दुखापत बरी आहे’, असे त्याने सांगितले आहे.
‘स्पर्धेनंतर दुखापत सहसा आणखी बिघडते. पण यावेळी इशान (फिजिओ) याने पॅरिसमध्ये माझ्यावर उपचार केले. मी त्याचे आभार मानू इच्छितो. तो 2017 पासून माझ्यासोबत आहे आणि त्याने मला दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या वेळी मदत केली आहे’, असेही चोप्राने सांगितले. गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून हा 26 वर्षीय खेळाडू दुखापतीवर नियंत्रण ठेवत आला आहे. ब्रुसेल्समधील हंगामाच्या अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी चोप्राला डायमंड लीग मालिकेतील आघाडीच्या सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळणे आवश्यक आहे.
‘मी डायमंड लीगच्या अगोदर प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंडला आलो. सुदैवाने माझी दुखापत वाढली नाही. कारण मी त्याची अतिरिक्त काळजी घेतली. मी इतर खेळाडूंप्रमाणेच माझा हंगाम सुरू ठेवण्याचा विचार केला. हंगाम संपेपर्यंत एक महिना बाकी आहे. मी माझ्या मोकळ्या वेळेत डॉक्टरांकडे जाईन’, असे त्याने सांगितले. ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ पदके हा भारतीय अॅथलीटसाठी एक अविस्मरणीय पराक्रम होता. परंतु अर्शद नदीमच्या 92.97 मीटरच्या सनसनाटी भालाफेकीने पाकिस्तानला ऐतिहासिक सुवर्ण मिळवून दिले.