नीरज चोप्रा आज पहिली ‘एनसी क्लासिक’ जिंकण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ बेंगळूर
नीरज चोप्रा आज शनिवारी येथे होणाऱ्या पहिल्या एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धेत काही परिचित प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देणार असून घरच्या मैदानावर वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यास तो सज्ज झाला आहे. या वर्षी दुसऱ्यांदा 90 मीटर्सचे अंतर पार करण्याचे त्याचे उद्दिष्ट असेल.
27 वर्षांच्या नीरजने आतापर्यंत मोठी झेप घेतलेली असून खेळातील जवळजवळ सर्व पदके जिंकली आहेत. ऑलिंपिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदके, डायमंड लीग फायनल्स ट्रॉफी, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांत सुवर्णपदके यांचा त्यात समावेश होतो. परंतु नीरज चोप्रा क्लासिकच्या पहिली आवृत्तीचे महत्त्व मैदानावर यश मिळवण्यापेक्षा जास्त आहे. ही स्पर्धा भारतीय चाहत्यांना उच्च दर्जाची स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याची संधी देईल आणि यामुळे देशात या खेळाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदत होईल.
कांतिरवा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान चाहत्यांना दुहेरी ऑलिंपिक पदक विजेत्या नीरजची झलक पाहायला मिळेल. ही स्पर्धा फक्त एक तास चालेल. तो मे महिन्यात दोहा येथे त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 90 मीटर्सचे अंतर पार करणाऱ्या भालाफेकीपेक्षा जास्त अंतर पार करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. तो एका वर्षाच्या अंतराने भारतातील स्पर्धेत उतरत आहे. ‘भारतात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणे हे माझे खूप जुने स्वप्न आहे. माझ्यासाठी हे स्वप्न खरे ठरले आहे’, असे 2024 साली पॅरिसमध्ये रौप्यपदक जिंकण्यापूर्वी टोकियोमधील ऑलिंपिकमध्ये भारतीय अॅथलेटिक्सचा पहिला सुवर्णपदक विजेता ठरलेल्या हरियाणाच्या खांद्रा गावातील या खेळाडूने सांगितले.
चोप्राने अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) आणि वर्ल्ड अॅथलेटिक्सच्या सहकार्याने जेएसडब्ल्यू स्पोर्ट्ससोबत या स्पर्धेचे आयोजन केले आहेत. चोप्रा म्हणाला की, एनसी क्लासिक ही वार्षिक स्पर्धा असेल आणि भविष्यात भालाफेकीच्या संगतीला इतर स्पर्धा जोडण्याची त्याला आशा आहे. एनसी क्लासिक यापूर्वी 24 मे रोजी पंचकुला (हरियाणा) येथे होणार होती, परंतु अपुऱ्या प्रकाशयोजनेमुळे बेंगळूर येथे हलवण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे हा कार्यक्रम नंतर पुढे ढकलण्यात आला. वर्ल्ड अॅथलेटिक्सने या स्पर्धेला ‘अ’ श्रेणीचा दर्जा दिल्याने ही भारतात होणारी एका प्रकारातील सर्वांत हाय-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा ठरणार आहे.
काही खेळाडूंनी यातून अंग काढून घेतलेले असून दोन वेळा विश्वविजेता राहिलेला ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्सही दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. असे असले, तरी चोप्राची स्टार पॉवर स्टेडियम खचाखच भरून काढण्यास पुरेशी असेल. चोप्रा हा विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांत भक्कम दावेदार असेल. कारण ज्युलियन वेबर यात झळकणार नाही आणि पीटर्सने माघार घेतली आहे. या जोडीने या हंगामात चोप्राला सर्वाधिक आव्हान दिले. तथापि, जर्मनीचा 2016 चा ऑलिंपिक विजेता थॉमस रोहलर, केनियाचा 2015 चा विश्वविजेता ज्युलियस येगो आणि अमेरिकन कर्टिस थॉम्पसन हे चोप्रासाठी मुख्य आव्हानवीर ठरू शकतात. तथापि रोहलर व येगो अलीकडच्या काळात सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसलेले नाहीत.