‘एआययू’च्या नोंदणीकृत चाचणी गटात नीरज चोप्रा, सचिन यादव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव हेच तेवढे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी वर्ल्ड अॅथलेटिक्सची उत्तेजकविरोधी देखरेख संस्था असलेल्या अॅथलेटिक्स इंटेग्रिटी युनिटच्या (एआययू) नोंदणीकृत चाचणी गटात (आरटीपी) स्थान मिळवणारे भारतीय खेळाडू आहेत.
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता चोप्रा या यादीत नियमितपणे झळकत असतो, तर गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर यादवने यात नव्याने स्थान मिळवले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या यादवने जागतिक स्पर्धेत चोप्रापेक्षा सरस कामगिरी केली, जिथे फिटनेसच्या सततच्या समस्यांमुळे चोप्रा आठव्या स्थानावर राहिला. यादवने 86.27 मीटरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करत केवळ चोप्रापेक्षाच नव्हे, तर विद्यमान ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानच्या अर्शद नदीमपेक्षाही वरचे स्थान मिळवले. नदीमचाही दिवस त्यावेळी खराब गेला आणि तो एकंदरित 10 व्या स्थानावर राहिला. उत्तर प्रदेशच्या या 26 वर्षीय आणि सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असलेल्या या खेळाडूकडे गेल्या अर्ध्या दशकाहून अधिक काळ चोप्राचे वर्चस्व असलेल्या भारतीय भालाफेक क्षेत्रातील पुढील मोठी आशा म्हणून पाहिले जात आहे.
आरटीपी हा अशा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सर्वोच्च श्रेणीचा गट आहे, ज्यांची पूर्वसूचना न देता चाचणी केली जाते. या यादीतील खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची माहिती, ज्यात घराचा पत्ता समाविष्ट असतो, द्यावी लागते आणि दररोज 60 मिनिटांची अशी एक वेळ निश्चित करावी लागते, ज्या दरम्यान ते चाचणीसाठी उपलब्ध असतील. नवीन ‘आरटीपी’ यादीत इथिओपिया, केनिया आणि अमेरिकेच्या खेळाडूंचे वर्चस्व आहे. मागील आरटीपी यादीत भालाफेकपटू किशोर जेना, स्टीपलचेसपटू अविनाश साबळे, महिला भालाफेकपटू अन्नू राणी आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर आणि जेस्विन आल्ड्रिन यांचाही समावेश होता. परंतु यापैकी कोणालाही नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या यादीत स्थान मिळालेले नाही.