नीरा भीमा साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार
इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय स्तरावर आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्या वतीने सन 2025-26 च्या गळीत हंगामासाठी देण्यात येणारा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नीरा भीमा कारखान्यास जाहीर झाला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, सन 2025-26 हा नीरा भीमा कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम होता. याच विशेष वर्षात विविध तांत्रिक निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळविल्याने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामुळे इंदापूर तालुक्यासह सहकार क्षेत्रातून कारखान्याचे अभिनंदन होत आहे. नीरा भीमा कारखान्याने आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एकूण 13 पुरस्कार मिळवत आपल्या कार्यक्षमतेची आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीची छाप उमटवली आहे.
नवी दिल्लीत 22 सप्टेंबरला पुरस्कार वितरण
या राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा मंगळवार, दि. 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांच्यासह कारखान्याचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.