अॅक्शन चित्रपट करण्याची नीना गुप्तांची इच्छा
अभिनयात मिळत असलेल्या विविध प्रयोगात्मक संधींचा आनंद घेणारी नीना गुप्ता अलिकडेच ‘दिल दोस्ती और डॉग्स’मध्ये दिसून आली आहे. नीना गुप्ता आता कामासोबत अधिकाधिक वेळ स्वत:च्या नातीला देण्याचा प्रयत्न कर आहेत.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आजी झालेल्या नीना गुप्ता यांच्या प्राथमिकता आता बदलल्या आहेत. मी मुंबईत असते तेव्हा शक्य तितका वेळ स्वत:च्या नातीसोबत घालविते. याचबरोबर मातृत्वाच्या दृष्टीकोनातून जे मला योग्य वाटते ते मसाबाला सांगत राहते. मसाबा काही प्रमाणात काम करू लागल्याने तिला आता काम अन् मातृत्व यांच्यात संतुलन राखावे लागत असल्याचे नीना गुप्ता सांगतात. यापूर्वी सतीश कौशिक यांच्याकडून मला अॅक्शन चित्रपटाची ऑफर मिळाली होती. ते माझ्यासोबत एक चित्रपट तयार करणार होते. परंतु त्याच्या निर्मितीपूर्वीच त्यांचे निधन झाले. आणखी एका दिग्दर्शक मित्राने मला दुहेरी भूमिका असलेली पटकथा वाचून दाखविली होती. यात बंदुक चालवावी लागणार होती. परंतु हा चित्रपट सुरूच झाला नाही. एका हेरगिरीवर आधारित चित्रपटाची ऑफरही मागे पडली. आता मी अॅक्शन पटात काम करण्याची संधी मिळतेय का याची प्रतीक्षा करत असल्याचे नीना गुप्ता यांनी सांगितले आहे.