‘मस्त में रहने का’मध्ये नीना गुप्ता
चालू आठवड्यात नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ यांचा कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. नीना गुप्ता आणि जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही पहिल्यांदाच एकत्र मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कहाणी दोन एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. हे दोन्ही ज्येष्ठ नागरिक परस्परांच्या प्रेमात पडत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
मस्त में रहने का चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत मजेशीर आहे. यात एकटे राहणाऱ्या वृद्धांना पोलीस चोरीवरून सतर्क करत असल्याचे दिसून येते. जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता हे साकारत असलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा परस्परांच्या शेजारी राहत असतात. स्वत:च्या शेजाऱ्यांसोबत ते अधिक जोडून घेण्याच्या प्रयत्नात त्यांची भेट होत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात राखी सावंत देखील दिसून येणार आहे.
विजय मौर्य यांच्या दिग्दर्शनात निर्माण करण्यात आलेल्या ‘मस्त में रहने का’ या चित्रपटात नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, राखी सावंत यांच्यासोबत मोनिका पनवार, अभिषेक चौहान हे मुख्य भूमिकेत आहेत. विजय मौर्य यांनी या चित्रपटाची निर्मिती तसेच पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.