गच्चीवरून घरात प्रवेश; हातोडा, पकड, दोरी अन् हातमोजे; पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या निवासस्थानी घुसखोरीचे गूढ कायम; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी एका तरुणाने पहाटेच्या सुमारास कथितरित्या घुसखोरी केल्याची घटना 26 सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे 10 मीटर लांबीची दोरी आढळल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीच्या दिशेने प्रवेश केला. सकाळी सुमारे 7 वाजता बंगल्यातील सुरक्षा रक्षक आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडल्याचे सांगण्यात आले आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद करून तोडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाने आपण विद्यार्थी असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची ओळख, घरात प्रवेश करण्यामागील उद्देश आणि त्याच्याकडे आढळलेल्या साहित्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे निवासस्थानी उपस्थित नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संशयिताला सोडण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घरात घुसखोरीचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.