For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मारकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची गरज

12:13 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मारकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची गरज
Advertisement

जिल्ह्यात 96 प्राचीन मंदिरे, स्मारके : सर्वाधिक सौंदत्ती तालुक्यात 58 तर खानापूर तालुक्यात 40 स्मारके

Advertisement

बेळगाव : गदग जिल्ह्यातील लक्कुंडी येथे खजिना सापडला आहे. यानंतर खजिन्याचा शोध घेणाऱ्यांच्या नजरा बेळगाव जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक स्थळांकडे लागल्या आहेत. खजिन्याच्या आशेने जमिनी उत्खनन करण्याची कामे सुरू आहेत. मात्र अशा मालमत्तांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाकडून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, किल्ले व स्मारकांचे सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्यात 58 राज्य संरक्षित स्मारके, 38 केंद्र संरक्षित स्मारके अशी एकूण 96 प्राचीन स्मारके जिल्ह्यात आहेत. मात्र बहुतेक स्मारकांची दुरवस्था झाली आहे. सर्वाधिक सौंदत्ती तालुक्यात 58 तर यानंतर खानापूर तालुक्यात 40 स्मारके आहेत.

सौंदत्ती तालुक्यात सर्वाधिक प्राचीन स्मारके असून हुली गावात अधिक मंदिरे व विहिरी आहेत. खजिन्याचा शोध घेणारे लोक ऐतिहासिक मंदिरे व किल्ले आदी ठिकाणी लक्ष ठेवून असतात. दरम्यान, लक्कुंडी येथे खजिना सापडल्यानंतर हुली येथे काही लोक उत्खनन केल्याची बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. रायबाग तालुक्यातील पालीभावी येथे खजिना सापडल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी भेट देऊन माहिती घेतली होती. त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी कित्तूर, बैलहोंगल व खानापूरमध्ये उत्खनन करून खजिन्याचा शोध घेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

Advertisement

जिल्ह्यात लहान-सहान ऐतिहासिक मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र ही सर्व मंदिरे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित नाहीत. मात्र भावी पिढीला आपल्या इतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशाने प्राचीन मंदिरे व किल्ल्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. तसेच स्थानिकांनी अज्ञात व संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवून ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. जंगल परिसरात असणाऱ्या स्मारकांमध्ये खजिना शोधण्याचे प्रकार सर्वाधिक सुरू आहेत. तसेच जेथे सीसीटीव्ही व गार्ड नाहीत, अशा ठिकाणांनाही लक्ष करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राचीन मंदिरे व स्मारकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Tags :

.